जि. प. पोटनिवडणुकीत तत्कालिन विजयी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:47 AM2021-09-21T04:47:25+5:302021-09-21T04:47:25+5:30
संतोष वानखडे वाशिम : गतवेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची आता पोटनिवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागणार असून, ...
संतोष वानखडे
वाशिम : गतवेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची आता पोटनिवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागणार असून, पराभूत उमेदवारही कामाला लागल्याने त्यामध्ये विजयी कोण होणार? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
वाशिम जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ सदस्यांच्या रिक्त जागांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. गतवेळी विजयी झालेल्या दिग्गज उमेदवारांमध्ये जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती शोभा गावंडे, विजय खानझोडे, भाजपचे गटनेते उमेश ठाकरे, जनविकास आघाडीचे गटनेते स्वप्नील सरनाईक, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते चरण गोटे, सुनीता कोठाळे, दिलीप मोहनावाले, सरस्वती चौधरी, पूजा भुतेकर, उषा गरकळ, सुनीता चव्हाण, रत्नमाना उंडाळ, प्रमोद लळे यांचा समावेश आहे. गतवेळी विजयी झालेले बहुतांश उमेदवार पुन्हा पोटनिवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत तर दुसरीकडे गतवेळी पराभूत झालेले उमेदवारही पराभवाचा वचपा काढण्याच्या अनुषंगाने पोटनिवडणूक लढवत असल्याने लढती अटीतटीच्या होण्याचे संकेत आहेत. गतवेळचे विजेतेपद टिकवून ठेवण्यासाठी तत्कालिन सदस्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, त्यामध्ये कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागून आहे. गतवेळचे पक्षीय संख्याबळ बदलले तर याचा थेट परिणाम अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापतिपदाच्या वाटाघाटीवरही होऊ शकतो, अशी अंदाज राजकीय क्षेत्रातून वर्तविला जात आहे.
......
वैध उमेदवारांच्या यादीकडे लक्ष!
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वैध अर्ज ठरलेल्या उमेदवारांची यादी २१ सप्टेंबरला तालुकास्तरावर प्रसिद्ध केली जाणार आहे. याकडे यादीकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून आहे.