जि. प. शाळांत प्रवेशाकडे कल; खासगी शाळांकडून दाखल्यासाठी अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:46 AM2021-09-22T04:46:12+5:302021-09-22T04:46:12+5:30
गेल्या काही वर्षांत कॉन्व्हेंट कल्चरचे जाळे वाढल्याने जि.प. शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला होता. परिणामी, जि.प. शाळांची संख्या रोडावून ...
गेल्या काही वर्षांत कॉन्व्हेंट कल्चरचे जाळे वाढल्याने जि.प. शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला होता. परिणामी, जि.प. शाळांची संख्या रोडावून शिक्षक अतिरिक्त ठरू लागले, तसेच कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर ओढवली. गेल्या दीड वर्षातील कोरोना स्थितीमुळे मात्र चित्र पालटले आहे. शाळा बंद असताना केवळ ऑनलाइन शिक्षणासाठी १५ ते २५ हजार रुपये शुल्क अदा करणे विद्यार्थ्यांच्या पालकांना पटेनासे झाले. त्यामुळे अनेक पालक खासगी शाळांतून पाल्यांची नावे काढून जि.प. शाळांत दाखल करण्यावर भर देऊ लागले आहेत. अशात विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले देण्यासाठी शाळा अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
०००००००००००००००००००
शुल्क अदा करण्यासाठी तगादा
शिक्षण विभागाने कोणत्याही विद्यार्थ्याला शुल्काअभावी शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नसल्याचे, तसेच शाळेचा दाखला देण्यासाठी अडवणूकही करता येणार नसल्याचे आदेश शासन निर्णयान्वये निर्गमित केले होते. त्यानंतर शुल्कासाठी तगादा लावून काही ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
०००००००००००००००००
खासगी शाळांच्या पटसंख्येवर परिणाम
कोरोनाकाळात प्राथमिक शाळांचे वर्ग बंद असल्याने खासगी शाळांचेही ऑनलाइन वर्गच सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क पालकांना अदा करावे लागते. ही बाब परवडणारी नाही. उलट जि.प. शाळांत शुल्क न भरताच ऑनलाइन पद्धतीने नियमित शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. त्यामुळे जि.प. शाळांकडे प्रवेशासाठी कल वाढून खासगी शाळांच्या पटसंख्येवर आता परिणाम होऊ लागला आहे.
००००००००००००००
कोट : खासगी संस्था दाखला देत नसल्याच्या तक्रारी ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. काही ठिकाणी मुख्याध्यापकांकडेही अशा तक्रारी आल्या आहेत. पालकांनी शासनाच्या निर्देशानुसार १५ टक्के कपात झालेले शुुल्क अदा करूनही कोणत्या शाळा दाखला देत नसतील, तर पालकांनी थेट तक्रार केल्यास कारवाई करू.
- गजाननराव डाबेराव,
प्रभारी उपशिक्षणाधिकारी, जि.प. वाशिम.
-----------
तालुकानिहाय जि. प. प्राथमिक शाळा
तालुका - शाळा
कारंजा - १४७
मानोरा - १३२
मंगरुळपीर- ११९
वाशिम - १३७
रिसोड - १०८
मालेगाव - १३२