लाभार्थ्यांना धान्याचे वेळेत वाटप करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:07 AM2021-05-05T05:07:38+5:302021-05-05T05:07:38+5:30
वाशिम : सध्याचा काळ कोरोना संसर्गाचा आहे. या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून करण्यात येणारे ...
वाशिम : सध्याचा काळ कोरोना संसर्गाचा आहे. या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून करण्यात येणारे धान्याचे वाटप हे वेळेत झाले पाहिजे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात शनिवारी पार पडलेल्या जिल्हा दक्षता समितीची सभेत दिले.
सभेला जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील विंचनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानातून लाभार्थ्यांना मिळणारे धान्य हे वेळेत आणि नियमाप्रमाणे उपलब्ध झाले पाहिजे. कोणत्याही लाभार्थ्यांना धान्य मिळाले नाही, अशी तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. राज्य शासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्याला अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचे धान्य मोफत वितरित करण्यात यावे. केंद्र सरकारच्या योजनेतील धान्याचे वितरणसुद्धा लाभार्थ्यांना वेळेत वितरण झाले पाहिजे. शिवभोजन योजनेंतर्गत जिल्ह्यात मोफत थाळीचे वितरण गरजू आणि गरिबांना केले पाहिजे. जे लाभार्थी कोरोना बाधित आहेत, त्यांचे धान्य घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात यावी.’’
जिल्हा पुरवठा अधिकारी विंचनकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यात ७७६ रास्त भाव दुकाने आहेत. यापैकी १२ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. रद्द करण्यात आलेल्या दुकानांच्या लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका जवळच्या रास्त भाव दुकानाला जोडण्यात आल्यामुळे कोणताही लाभार्थी हा धान्यापासून वंचित नाही. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेचे ४८ हजार २९३ कार्डधारक आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील १ लाख ७७ हजार ६२७ कार्डधारक अशा एकूण २ लाख २५ हजार ९२० कार्डधारकांना ५५ हजार ६९० क्विंटल गहू आणि तांदूळ लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून २ लाख २५ हजार ९२० कार्डधारकांना ४९ हजार ५०० क्विंटल धान्य मे आणि जून महिन्यात मोफत वितरित केले जाणार आहे.’’