कन्या वनसमृद्धीअंतर्गत फळझाडांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:35+5:302021-07-03T04:25:35+5:30
कन्या वनसमृद्धी योजनेंतर्गत ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल, अशा शेतकरी दाम्पत्याला शासनाच्या वतीने विविध वृक्षांची दहा रोपे लागवडीसाठी विनामूल्य ...
कन्या वनसमृद्धी योजनेंतर्गत ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल, अशा शेतकरी दाम्पत्याला शासनाच्या वतीने विविध वृक्षांची दहा रोपे लागवडीसाठी विनामूल्य दिली जाणार आहेत. या योजनेमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग असावा, यासाठी सामान्य लोकांच्या सामाजिक गरजांचे भान ठेवून ही योजना तयार केली आहे. वनखात्याची असलेली ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेचा हातभार लागत आहे.
निसर्गात झालेले मोठे फेरबदल, पावसाचा लहरीपणा, नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेली वाढ, वाढते प्रदूषण अशा अनेक कारणांवर प्रभावी उपाययोजना म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याशिवाय पर्याय नाही, हे जागतिक स्तरावर मान्य झाल्याने, आता विविध माध्यमांतून राज्यातील वनक्षेत्र व वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी वनविभागाकडून विविध योजनांद्वारे वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले जात आहे. मात्र, अशा योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचतच नाहीत.
-------------
व्यापक जनजागृतीची गरज
शासनाने सुरू केलेल्या कन्या वनसमृद्धी योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसते. त्यामुळे या योजनेबाबत व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात ज्या शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला येईल, त्या शेतकऱ्याने वनविकास विभागाकडून वृक्ष घेऊन मालकीच्या उपलब्ध जागेत किमान १० वृक्ष लावावेत व संबंधित माहिती नजीकच्या वनकार्यालयात सादर करावयाची आहे. लागवड केलेल्या झाडांपासून मिळणारे सर्व उत्पन्न मुलीच्या कौशल्यविकास, उच्चशिक्षण व मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या ऐच्छिकतेनुसार वापरण्यास मुभा राहणार आहे.