वाशिम जिल्ह्यात १० फेब्रुवारी रोजी होणार जंतनाशक गोळ्यांचे वाटप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 06:01 PM2018-01-27T18:01:28+5:302018-01-27T18:37:17+5:30
वाशिम : जिल्ह्यातील एक ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त १० फेब्रुवारी २०१८ रोजी जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
वाशिम : जिल्ह्यातील एक ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त १० फेब्रुवारी २०१८ रोजी जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सुमारे ३ लक्ष ६९ हजार मुला-मुलींना १० फेब्रुवारी २०१८ रोजी जंतनाशक गोळीचे वाटप करण्याचे नियोजन आहे. तसेच यादिवशी शाळेत गैरहजर असलेल्या मुलांसाठी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी मॉपअप दिनी जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येईल. या दिवशी आपल्या पाल्यांना आवर्जून शाळेत पाठवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, अंगणवाडी, एकात्मिक महिला व बालविकास विभाग, शाळा, महाविद्यालयांशी समन्वय साधत ही मोहीम राबविण्यात येणार असून सर्व विभागांनी याकरिता सहकार्य करून या मोहिमेतून एकही मूल वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिल्या. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात एक ते १९ वर्षे वयोगटातील किमान ६८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाºया जंतूमुळे होतो. हाच कृमीदोष रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण ठरतो. तसेच यामुळे बालकाची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते. त्यामुळे राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने एक ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडीमध्ये जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. या गोळीचा कोणताही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होणार नाही. त्यामुळे याबाबत कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगितले.