वाशिम जिल्ह्यातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 02:53 PM2018-02-10T14:53:20+5:302018-02-10T14:57:19+5:30
वाशिम : १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या आतड्याचा कृमीदोष टाळण्याच्या दृष्टिकोनातून १० फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय व अंगणवाडी केंद्र अशा एकूण २३७२ ठिकाणी जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
वाशिम : १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या आतड्याचा कृमीदोष टाळण्याच्या दृष्टिकोनातून १० फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय व अंगणवाडी केंद्र अशा एकूण २३७२ ठिकाणी जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
मातीतून प्रसारित होणाºया जंतूमुळे आतड्याचा कृमीदोष होत असल्याने आणि हा कृमीदोष रक्तक्षय आणि कुपोषणाचे प्रमुख कारण असल्याने, यावर नियंत्रण म्हणून १० फेब्रुवारी रोजी अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय अशा एकूण २३७२ ठिकाणी १ ते १९ वर्षे वयोगटातील जवळपास ३.७९ लाख मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले होते. १० फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी केंद्र असल्याने सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यात ग्रामीण भागात शासकीय १००८, खासगी अनुदानित ११९ अशा एकूण पहिली ते बारावीपर्यंत ११२७ शाळा आहेत. तसेच ग्रामीण भागात एकूण १०६४ अंगणवाडी केंद्र आहेत. शहरी भागात शासकीय ९८ व खासगी अनुदानित ५२ अशा एकूण पहिली ते बारावीपर्यंत १५० शाळा तसेच ३१ अंगणवाडी केंद्र आहेत. अशा एकूण २३७२ ठिकाणी जवळपास दोन लाख ३० हजार मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वाशिम तालुक्यातील सावरगाव बरडे येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.व्ही. मेहकरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात आली.
१० फेब्रुवारी रोजी शाळेत गैरहजर असलेल्या मुलांसाठी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी मॉपअप दिनी जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येणार आहे. गैरहजर असलेल्या मुला-मुलींनी १५ फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले.