वाशिम जिल्ह्यात रेशनच्या दुकानांमधून निकृष्ट डाळीचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 09:46 AM2019-08-22T09:46:19+5:302019-08-22T09:46:54+5:30
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशनच्या दुकानातून अत्यंत निकृष्ट दर्जाच्या डाळीचे वितरण केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशनच्या दुकानातून अत्यंत निकृष्ट दर्जाच्या डाळीचे वितरण केले जात आहे. निकृष्ट डाळ विकत घेण्यास शिधापत्रिकाधारकांनी विरोध दर्शविला असून, दुसरीकडे ही निकृष्ट डाळ विकण्याची सक्ती रेशन दुकानदारांवर केली जात आहे.
राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत संपूर्ण राज्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर गत दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात तुरीची खरेदी करण्यात आली. यातील काही तुरीची लिलावाद्वारे विक्री करण्यात आली, तर उर्वरित तुरीची भरडाई करून डाळीची विक्री स्वस्त धान्य दुकानांतून करण्याचा निर्णय शासनाने २८ नोव्हेंबर २०१८ रोजी घेतला. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाकडून तुरीची खरेदी करण्यात आली असल्याने तुरची भरडाई त्यांच्याकडून करून ही डाळ संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार उपलब्ध करून स्वस्तधान्य दुकानांतून विकण्यास सुरुवातही झालेली आहे. सुरुवातीला ५५ रुपये प्रति किलोदराने आणि प्रति शिधापत्रिकेवर एक किलोप्रमाणे ही डाळ स्वस्तधान्य दुकानांतून वितरीत करण्यात येत होती. मध्यंतरी या डाळीचे दर ३५ रुपये प्रति किलो करण्यात आले. त्यामुळे डाळ खरेदीला प्रतिसाद मिळाला. आता मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या डाळीचे दर पुन्हा ५५ रुपये प्रति किलो करण्यात आले. त्यातच शिधापत्रिकांवर मिळणारी ही डाळ अत्यंत निकृष्ट असल्याने शिधापत्रिकाधारक ते घेण्यास तयार नाहीत. या डाळीला किड लागल्याचेही काही ठिकाणी दिसत आहे. खाण्यात ही डाळ वापरल्यास आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भिती आहे. तथापि, स्वस्तधान्य दुकानदारांना ही डाळ विकण्याची सक्ती असल्याने त्यांचीही पंचाईत झाली आहे. निकृष्ट दर्जाची डाळ विकण्याची सक्ती कुणाकडून केली जात आहे? या प्रश्नाच्या खोलात जाण्याची गरज आहे. या गंभीर प्रकाराकडे पुरवठा विभागाने लक्ष देणे अपेक्षीत आहे.
जिल्ह्यात रेशन दुकानांत वितरीत करण्यात येत असलेली डाळ कशी आहे, त्याची तपासणी करण्याच्या सुचना तहसीलदारांना देण्यात येतील. शिधापत्रिकाधारकांनीही तूरडाळ निकृष्ट असेल, तर पुरवठा विभाग किंवा तहसीलस्तरावर तक्रार करून प्रशासनाला अवगत केल्यास दखल घेऊन तात्काळ पडताळणी करण्यात येईल.
-देवराव वानखडे
जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पुरवठा करण्यात आलेली तूर डाळ निकृष्टदर्जाची असल्याने शिधापत्रिकाधारक ते घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे डाळ विकावी कुठे हा प्रश्न प्रामुख्याने ग्रामीण भागातील स्वस्तधान्य दुकानदारांसमोर उपस्थित होत आहे. पुरवठा विभागाने स्वस्तधान्य दुकांनासाठी उपलब्ध झालेले धान्य उतरविण्यापूर्वीच तपासणी करावी आणि ते निकृष्ट असल्यास परत पाठवावे, अशी आमची मागणी आहे.
-तान्हाजी काळे
जिल्हाध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार संघटना वाशिम