पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनातर्फे केली जातेय चाचपणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 07:42 PM2017-10-15T19:42:08+5:302017-10-15T19:42:45+5:30
यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून चाचपणी चालविली आहे. यासंदर्भात नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनीदेखील आढावा बैठक घेऊन पाणीटंचाई संदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाºयांना केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून चाचपणी चालविली आहे. यासंदर्भात नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनीदेखील आढावा बैठक घेऊन पाणीटंचाई संदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाºयांना केल्या.
यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. पावसात सातत्य नसल्याने जलप्रकल्पांतदेखील समाधानकारक जलसाठा होऊ शकला नाही. ग्रामीण भागात तर आतापासूनच विदारक परिस्थिती आहे. विहिरींना पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने हिवाळ्यापासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट घोंघावण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामपंचायतींनी चाचपणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी प्रशासनाचा आढावा घेऊन पाणीटंचाई निवारणार्थच्या कामात कुणाचीही हयगय खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. गावातील जलपातळी, विहिरींतील जलसाठा, पाणीपुरवठा योजनांची स्थिती आदींच्या दृष्टिकोनातून चाचपणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आल्या.