गर्भवतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली रुग्णवाहिकेची व्यवस्था; पुरामुळे रस्ता बंद असल्याने जिवाला होता धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2022 03:12 PM2022-08-09T15:12:56+5:302022-08-09T15:13:14+5:30
वाशिम: जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पावसामुळे चंद्रभागा नदीला पूर आल्याने तोंडगावचा रस्ता बंद झाला. त्यामुळे एक गर्भवती महिलेचा जीव धोक्यात ...
वाशिम: जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पावसामुळे चंद्रभागा नदीला पूर आल्याने तोंडगावचा रस्ता बंद झाला. त्यामुळे एक गर्भवती महिलेचा जीव धोक्यात येऊ लागला होता. ही माहिती जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांना कळली. त्यावेळी जिन्हाधिकाऱ्यांनी त्या गर्भवतीस प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहाेचवण्यासाठी कन्हेरगावमार्गे २० किलोमीटर अंतराहून रुग्णवाहिका आणण्याची व्यवस्था आरोग्य विभागाला सुचना देऊन केली.
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.यांनी ८ ऑगस्ट रोजी वाशिम तालुक्यातील तोंडगाव परिसरात अतिवृष्टीमुळे चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची आणि पीक नुकसानीची पाहणी केली. जिल्हाधिकारी शण्मुगराजन यांनी चंद्रभागा नदीला पूर असल्यामुळे नदीच्या अलीकडील काठावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. नदीला पूर असल्यामुळे रस्ता बंद होता. त्यामुळे तोंडगाव येथील एक गर्भवती महिला प्रसवपिडेत त्रस्त असल्याचे त्यांना कळले. त्यामुळे या गर्भवतीस बाळंतपणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्या करसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका २० किमी अंतरावरून कन्हेरगाव मार्गावरुन पाठवून त्या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी शण्मुगराजन यांच्या सूचनेवरून करण्यात आली.