जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान’चा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 06:22 PM2021-08-17T18:22:26+5:302021-08-17T18:22:40+5:30
Washim News : जिल्हाधिकारी कार्यालयात १७ ऑगस्ट रोजी झालेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाच्या जिल्हास्तरीय कृती समितीच्या सभेत ते बोलत होते.
वाशिम : स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील दरी कमी करणयासाठी मुलींच्या जन्माचे स्वागत करणे अपेक्षीत आहे. मुलीचा जन्म झालेल्या घरासमोर ग्रामपंचायतीने मुलीच्या नावे एक झाड लावून तिच्या जन्माचे स्वागत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात १७ ऑगस्ट रोजी झालेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाच्या जिल्हास्तरीय कृती समितीच्या सभेत ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त एम. जी. वाठ, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त वि. द. सुलोचने, अशासकीय सदस्य डॉ. अलका मकासरे, सोनाली ठाकूर यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, मुलींच्या जन्माचे महत्व पटवून देण्यासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती मोहीम राबवावी. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित व्यक्तींना सहभागी करून घ्यावे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करणे, स्त्रीभ्रूण हत्या हा कायद्याने गुन्हा असून असे प्रकार होत असल्यास त्याची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या हेल्पलाईनविषयी जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. मुलींच्या जन्मदराविषयी तालुकानिहाय आढावा घेतला. तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या स्तरावरून करण्यात येत असलेल्या जनजागृतीविषयी माहिती घेतली.
गर्भलिंग तपासणी होत असल्यास माहिती द्या
जिल्ह्यामध्ये गर्भलिंग तपासणी होत असल्यास त्याची माहिती गोपनीयरित्या प्राप्त होण्यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ समितीमार्फत ८४५९८१४०६० हा स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात गर्भलिंग तपासणी होत असल्यास त्याची गोपनीय माहिती अथवा तक्रारी नागरिकांना या हेल्पलाईन क्रमांकावर पाठविता येतील, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जोल्हे यांनी सांगितले.