जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोरोनाविषयक स्थितीचा आढावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:41 AM2021-03-10T04:41:15+5:302021-03-10T04:41:15+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ...
जिल्हाधिकारी कार्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर या बैठकीत सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. यापुढे शहरातील ज्या भागात अथवा गावात जास्त रुग्ण आढळतील, त्या भागातील सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करावी. तसेच ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’चे प्रमाण वाढवून प्रत्येक रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान २० ते ३० व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. ज्या गावांमध्ये ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत, अशा गावांमध्ये घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यात मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या नियमांचे पालन होणे अतिशय गरजेचे आहे. मात्र, तरीही शहरी व ग्रामीण भागात काही दुकानदार, आस्थापनाधारक, नागरिक यांच्याकडून कोरोना सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे दिसते. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे म्हणाले, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे. तरीही लग्न अथवा इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने गर्दी होत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी. शहरी व ग्रामीण भागातील व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार यांची कोरोना चाचणी करणे आवश्यक असून संबंधित यंत्रणांनी यासाठी संबंधित गावे, शहरात विशेष कॅम्पचे आयोजन करण्याच्या सूचना हिंगे यांनी दिल्या.