जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:41 AM2021-05-13T04:41:46+5:302021-05-13T04:41:46+5:30
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा शल्य ...
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आर. जे. तायडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे, जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता खान या आढावा बैठकीत सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यातील ज्या गावांना पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे, त्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचे नियोजन तहसीलदार यांनी गटविकास अधिकारी यांच्या समन्वयातून आवश्यक त्या उपाययोजना करून करावे. विशेषतः मालेगाव तालुक्यातील ज्या गावांना संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येणार आहे, त्या गावांना तहसीलदार यांनी भेट द्यावी. प्रस्तावाची वाट न पाहता उपाययोजना कराव्यात. लोकप्रतिनिधींनी प्रस्तावित केलेल्या गावांव्यतिरिक्त ज्या गावांना पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे, त्या गावांना पाणी पुरवठ्याबाबतचे नियोजन करावे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि नगरपालिकांमध्ये आवश्यक तेवढा ब्लिचिंगचा साठा उपलब्ध असावा, असे सांगून जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, पिण्याचे पाणी दूषित होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी शाम सवाई, दीपक सदाफळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तसेच संबंधित अधिकारी या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
०००
इमारती व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट
जिल्ह्यातील धोकादायक असलेल्या शाळा, आरोग्य विभागाच्या इमारती व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बांधकाम विभागाने करावे. पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या वादळाने व अतिवृष्टीने जी झाडे पडण्याची शक्यता आहे, त्याचा शोध महावितरण कंपनीने घ्यावा. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणार नाही, यादृष्टीने महावितरण कंपनीने पूर्वतयारी करावी. तसेच त्यांची पथके तैनात ठेवावीत. वीज पडून प्राणहानी होऊ नये यासाठी ग्रामस्थांना सतर्क करावे. स्वयंसेवकांच्या याद्या तयार कराव्यात. साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी ग्रामपंचायती, नगरपंचायती आणि नगरपालिकांनी दक्षता घेऊन पूर्वतयारी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
००००
ग्रामसेवकांनी मुख्यालय सोडू नये
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी पावसाळ्याच्या दिवसात आपले मुख्यालय सोडू नये. संबंधित गावाच्या काही अडचणी असतील तर गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या. पावसाळ्याच्या दिवसात गर्भवती महिला व स्तनदा मातांची काळजी घ्यावी. विशेषतः ज्या गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात ये-जा करण्यास अडचण होते, अशा गावातील या महिलांची काळजी घ्यावी.
०००००