नदीजोड प्रकल्पातून जिल्हा वगळला; ‘भूमिपुत्र’ बसले बेमुदत उपोषणाला!
By सुनील काकडे | Published: February 21, 2024 07:04 PM2024-02-21T19:04:58+5:302024-02-21T19:05:10+5:30
बहुप्रतिक्षीत नदीजोड प्रकल्पातून जिल्ह्याला वगळण्यात आले आहे.
वाशिम: बहुप्रतिक्षीत नदीजोड प्रकल्पातून जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. यामुळे संतापलेल्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २० फेब्रुवारीपासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र, प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष केले आहे. दोन दिवस उलटूनही आंदोलनाची कुठलीच दखल घेण्यात आलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असणाऱ्या नदीजोड प्रकल्पाचा आराखडा समोर आला आहे. त्यात जिल्ह्याचा कुठेही समावेश नाही. शासनाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांची चक्क दिशाभूल केली. यामुळे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर व जिल्हाध्यक्ष रामेश्वर आवचार यांनी बेमुदत उपोषण आरंभिले आहे.
शेतकऱ्यांना त्रास देणारे रोही, हरीण, माकड, रानडुक्करांच्या बंदोबस्तासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, सोयाबीनची नाफेडद्वारा खरेदी करण्यात यावी, अग्रीम पीकविम्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा, कृषी पंपाला मोफत व मुबलक वीज मिळावी, ग्रामिण भागातील गोरगरीब कुटुंबांना मिळणाऱ्या घरकुल अनुदानात दुप्पटीने वाढ करावी व जागेचा प्रश्न मार्गी लागावा, आदी स्वरूपातील मागण्याही यामाध्यमातून पुढे रेटल्या जात आहेत. आंदोलनास सर्वच स्तरांतून पाठिंबा दर्शविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.