जिल्ह्यात महिनाभरातच ४६ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:57 PM2018-07-11T12:57:04+5:302018-07-11T12:58:37+5:30
वाशिम: गतवर्षी वाशिम जिल्ह्यावर रुसलेला वरूण राजा यंदा मात्र चांगलाच बरसत आहे. जिल्ह्यात यंदा मान्सूनला सुरुवात झाल्यापासून अवघ्या महिनाभरातच वार्षिक सरासरीच्या ४६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: गतवर्षी वाशिम जिल्ह्यावर रुसलेला वरूण राजा यंदा मात्र चांगलाच बरसत आहे. जिल्ह्यात यंदा मान्सूनला सुरुवात झाल्यापासून अवघ्या महिनाभरातच वार्षिक सरासरीच्या ४६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पिक परिस्थिती उत्तम झाली असून, भूजल पातळीतही यामुळे वाढ होण्यास आधार मिळणार आहे.
वाशिम जिल्ह्यात गत काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत आहे. याचा परिणाम कृषी उत्पादनावर आणि पर्यायाने आर्थिक स्थितीवर होत आहे. गतवर्षी वाशिम जिल्ह्यात केवळ ८४ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्हावासियांना गत १० वर्षांतील सर्वात भीषण अशा पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागला. खरीपाचा हंगाम होरपळला, रब्बीची पेरणी घटली. यामुळेच दुष्काळी स्थिती निर्माण झाली. आता यंदा मात्र वाशिम जिल्ह्यात बºयापैकी पाऊस कोसळत आहे. मान्सून सुरु होण्यापूर्वीच जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले. जूनच्या मध्यंतरी पावसाने खंड दिल्यानंतर सुरुवातीला पेरणी करणारा बळीराजा चिंताग्रस्त झाला होता; परंतु ही चिंता फार टिकली नाही आणि पावसाने १८ जूनपासून पुन्हा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. यंदा प्रामुख्याने मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यात पावसाची सरासरी अधिक आहे. मंगरुळपीर तालुक्यात १० जूनपर्यंत ४०७. ३३ मि.मी. पावसाची नोंद झाली. या तालुक्यात १ जून ते १० जूनपर्यंत पडणाºया पावसाच्या तुलनेत हे प्रमाण १८९.२० टक्के आहे, तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५५.६२ टक्के आहे. कारंजा तालुुक्यात १० जूनपर्यंत ३९४.९४ मि.मी. पावसाची नोंद झाली. या तालुक्यात १ जून ते १० जूनपर्यंत पडणाºया पावसाच्या तुलनेत हे प्रमाण १७२.२८ टक्के आहे, तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५५.०० टक्के आहे. त्याशिवाय मालेगाव तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४४.०८ टक्के, मानोरा तालुक्यात ४२.४३ टक्के, वाशिम तालुक्यात ४१.१९ टक्के, तर रिसोड तालुक्यात ४१.०८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.