जिल्ह्याला लसीचे २० हजार डोस प्राप्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:39 AM2021-04-13T04:39:41+5:302021-04-13T04:39:41+5:30
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर नियंत्रण मिळविणे व नागरिकांना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रभावी उपाय असलेल्या कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड ...
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर नियंत्रण मिळविणे व नागरिकांना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रभावी उपाय असलेल्या कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे २० हजार डोस सोमवार, १२ एप्रिल रोजी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. १३ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व केंद्रावर लसीकरण मोहिम पूर्ववत होणार आहे.
देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम जिल्ह्यात गतवर्षी जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा आलेख वाढल्याने सर्वांचीच चिंताही वाढली. दिवसागणिक झपाट्याने वाढत चाललेल्या या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकीकडे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले; तर दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेलाही गती देण्यात आली. १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील सर्वांना लस दिली जात आहे. दरम्यान, गत दोन दिवसात जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने जवळपास ११७ केंद्रांतील लसीकरण मोहिम प्रभावित झाली होती. लसीचा साठा केव्हा उपलब्ध हाेइल, याकडे लक्ष लागून होते. अखेर १२ एप्रिल रोजी लसीचे २० हजार डोस उपलब्ध झाले आहेत. प्राप्त लसीचे डोस जिल्ह्यातील सर्व केंद्रांत पोहचविण्यात येत असून, मंगळवारपासून लसीकरण मोहिम पूर्ववत होइल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
------
बॉक्स..
प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा गजबजणार
जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लसीकरणासाठी यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांची गर्दि होत होती. गत तीन दिवसांत लसीचा तुटवडा असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्रातील लसीकरण ठप्प झाले हाेते. त्यामुळे नागरिकांची गर्दीही ओसरली होती. आता लसीचे २० हजार डोस उपलब्ध झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा गजबजणार आहेत.
...........
बॉक्स.....
दुसरा डोसही मिळणार
कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोस घ्यावा लागतो; मात्र गत तीन दिवसांत लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने दुसरा डोस लांबणीवर पडला होता. आता लसीचे २० हजार डोस उपलब्ध झाल्याने दुसरा डोसही मिळणार आहे.
--------
कोट .....
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे २० हजार डोस आजच प्राप्त झाले आहेत. या लसीचा पुरवठा संबंधित केंद्रांमध्ये केला जात असून, मंगळवारपासून लसीकरण मोहिम पूर्ववत होणार आहे. कोरोना लस ही पूर्णत: सुरक्षित असून, पात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
-डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम
....
(लसीचा फोटो घेता येईल. )