जि.प.शाळा इमारत मोडकळीस
By admin | Published: April 27, 2017 12:36 AM2017-04-27T00:36:16+5:302017-04-27T00:36:16+5:30
अपघाताची शक्यता : ६७ वर्षापूर्वीचे मातीचे बांधकाम
उंबर्डाबाजार : येथुन जवळच असलेल्या मौजे दुघोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी वरिष्ठ शाळेच्या जुन्या इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या ६७ वर्षापुर्वी या शाळेच्या इमारतीचे मातीत बांधकाम झाले असल्याने शाळेची इमारत मोडकळीस आली असून शिक्षक वर्ग जीव मुठीत घेवुन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे. तर विद्यार्थी सुध्दा जीव धोक्यात घालुन शिक्षण ेघेत असतांना शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीचे मात्र या प्रकाराकडे हेतपुरुस्पर दुर्लक्ष दिसून येत असल्याने पालक वर्गात संताप व्यक्त होत आहे. आगामी शैक्षणिक सत्राच्या अगोदर शाळेला नवीन चार वर्ग खोल्या उपलब्ध झाल्या नाही तर विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नसल्याचा इशारा गावकऱ्यांच्यावतीने शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष उध्दव पायरु गवई यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातुन दिला आहे.
दुघोरा येथील जिल्हा परिषद प्राथमीक मराठी वरिष्ठ शाळेची स्थापना ६ जुलै १९४९ साली होवुन सदर शाळेच्या चार वर्गखोल्याचे बांधकाम मातीत झाले असल्याने इमारत धोकादायक होवुन अनेक ठिकाणी क्षतीग्रस्त होवुन शाळेच्या काही भिंती वाकल्या सुध्दा आहे.शाळेला १ ते ८ पर्यंत वर्ग असुन जवळपास २५० विद्यार्थी शिक्षण घेत असून सात वर्ग खोल्यापैकी चार ६७ वर्षापुर्वी मातीत बांधकाम झालेल्या वर्ग खोल्यांचा समावेश आहे. जुन्या इमारतच्या मागील बाजुची अर्धेअधिक टिनपत्रे सुसाट्याच्या वाऱ्यात उडुन गली असून टिनपत्र्याखाली असणारे खांब सुध्दा मोठ्या प्रमाणात तुटुन पडली आहे. खिडक्यांची अवस्था सुध्दा पाहण्यासारखीच आहे.
इमारतीवर सद्यस्थितीत असलेली टिनपत्रे व खांब विद्यार्थी तथा शिक्षकांच्या अंगावर पडतील याचा नेमच राहिला नाही. विशेष म्हणजे शाळेच्या स्वच्छतागृहाला लागुनच उघड्यावर विज वितरण कंपनीचे ट्रॉन्सफॉर्मर असून फ्युज बॉक्स उघडाच असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तसेच ट्रॉन्सफॉर्मर मधील विजेच्या जीवंत तारा शाळेच्या इमारती वरुन गेल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे.
आमचे गाव आमचा विकास योजनेंतर्गत शाळा दुरुस्ती साठी ५ लाख रुपयाचा निधी गेल्या एक वर्षापासून ग्रामपचांयतीच्या खात्यात पडुन संबंधीतांना मात्र शाळा दुरुस्तीचा विसर पडलेला दिसत आहे. याबाबत मुख्याध्यापक,, शाळा व्यवस्थापन समिती, गावकरी मंडळीनी अनेकदा अर्ज, विनंती, तक्रारी करुन शिक्षण विभागाला सुचित केले. मात्र श्क्षिण विभागाने अद्याप लक्ष दिले नाही.