जिल्हा तिसऱ्या टप्प्यात; निर्बंध पुन्हा लागू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:28 AM2021-06-26T04:28:24+5:302021-06-26T04:28:24+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पाच स्तरांत राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली होती. त्यानुसार, जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटिव्ही ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पाच स्तरांत राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली होती. त्यानुसार, जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटिव्ही रेट २.२५ टक्के व ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९ टक्क्यावर आल्याने जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात झाला. त्यामुळे ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध १४ जूनपासून हटवून संपूर्ण जिल्हा अनलाॅक करण्यात आला. यामुळे कोरोना काळात थांबलेल्या जिल्ह्यातील अर्थचक्राला गेल्या काही दिवसांत नव्याने उभारी मिळाली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चा धोका उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच ठेवण्याचा निर्णय २५ जूनरोजी घेतला आहे. यासंबंधीची नवी नियमावली २८ जूनपासून जिल्ह्यात लागू होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
..........................
कोट :
वाशिम जिल्ह्यात १ जूनपासून कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट झालेली आहे. असे असले तरी शासनाने राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच वाशिमचाही तिसऱ्या टप्प्यात समावेश केलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात २८ जूनपासून पुन्हा पूर्वीप्रमाणेच निर्बंध लागू केले जाणार आहेत. नवी नियमावली लवकरच जाहीर करण्यात येईल.
- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम