लसीकरण मोहिमेत विभागात जिल्हा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:29 AM2021-09-02T05:29:15+5:302021-09-02T05:29:15+5:30
वाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम गतिमान करण्यावर भर दिला जात आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये ...
वाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम गतिमान करण्यावर भर दिला जात आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये अमरावती विभागामध्ये वाशिम जिल्हा अग्रेसर असून, जिल्ह्यातील १८ वर्षांवरील सुमारे ३८ टक्के व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे.
सध्या कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. केरळसह इतर काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक गतिमान करण्यावर वाशिम जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. शहरी व ग्रामीण भागामध्ये सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जात आहे. याकरिता जिल्ह्यामध्ये पुरेशा प्रमाणात लसींची उपलब्धता आहे. जिल्ह्यातील १८ वर्षांवरील ३८ टक्के व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. अकोला जिल्ह्यात २८.९८, अमरावती २९.३४, बुलडाणा २९.४१ तर यवतमाळ जिल्ह्यात हीच टक्केवारी २९.७३ अशी आहे.
०००००००००००००००
२८ टक्के युवकांना मिळाली लस
जिल्ह्यात आतापर्यंत १८ ते ४४ वर्षे वयोगटातील १ लाख ६८ हजार ६७३ जणांचे म्हणजेच पात्र लोकसंख्येच्या २८ टक्के लसीकरण करण्यात आले आहे. ४५ वर्षांवरील २ लाख २३ हजार ८९० व्यक्तींचे म्हणजेच पात्र लोकसंख्येच्या ५४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
००००००
तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी लस घ्या
कोरोना नियंत्रणात असला तरी कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरण मोहीम गतिमान करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत कोरोना प्रतिबंधक लसीचे ६० हजार डोस उपलब्ध झाले असून, लवकरच आणखी २० हजार डोस उपलब्ध होतील. जिल्ह्यातील पात्र असलेल्या व्यक्तींनी लसीचा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले.