वाशिम जिल्ह्यात ४३७ वर्गखोल्या शिकस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 04:15 PM2019-06-16T16:15:57+5:302019-06-16T16:16:30+5:30
जिल्हा परिषद शाळेच्या ४०९ आणि नगर परिषद शाळेच्या २८ अशा एकूण ४३८ वर्गखोल्या शिकस्त झाल्या असून, या वर्गखोल्या विद्यार्थ्यांसाठी बसण्यायोग्य नाहीत.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : एकिकडे शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा भौतिक सुविधांसाठी धडपडत आहेत. वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या ४०९ आणि नगर परिषद शाळेच्या २८ अशा एकूण ४३८ वर्गखोल्या शिकस्त झाल्या असून, या वर्गखोल्या विद्यार्थ्यांसाठी बसण्यायोग्य नाहीत. २६ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार असून ४३७ शिकस्त वर्गखोलीतील विद्यार्थ्यांना अन्य वर्गखोलीत बसावे लागणार आहे.
वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ७७८ शाळांमध्ये ६५ हजाराच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी नानाविध प्रयोग केले जात आहेत. लोकसहभागातून शाळांना डिजिटलची जोड दिली जात आहे. मात्र, शासनाकडून पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध होत नसल्याने शिकस्त वर्गखोल्यांची समस्या गंभीर बनत चालली आहे. जिल्हा परिषद शाळेच्या ४०९ आणि नगर परिषद शाळेच्या २८ अशा एकूण ४३७ वर्गखोल्या या विद्यार्थ्यांसाठी बसण्यायोग्य नाहीत. धोकादायक स्थितीत असलेल्या या वर्गखोल्यांची दुरूस्ती करण्यासाठी शासनाकडून पुरेशा प्रमाणात निधीची प्रतीक्षा आहे. सन २०१९-२० या वर्षात निर्लेखित वर्गखोल्यांची दुरूस्ती सुरू नसल्याने या वर्गखोलीतील विद्यार्थ्यांना संबंधित शाळेतील अन्य वर्गखोलीत बसविण्याची वेळ शिक्षकांवर येणार आहे. वादळवाºयामुळे मंगरूळपीर तालुक्यातील जोगलदरी आणि मालेगाव तालुक्यातील मोहजाबंदी या शाळेवरील टिनपत्रे उडून गेली होती. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. जोगदलरी येथील शिकस्त वर्गखोलीतील विद्यार्थ्यांना व्हरांड्यात किंवा अन्य वर्गखोलीत बसविले जाते.
निर्लेखित वर्गखोल्यांची (बसण्या योग्य नसलेल्या शाळांची) माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे प्रस्तावित करण्यात आली आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.