कोरोना लसीकरण केंद्र, कंटेन्मेंट झोनला विभागीय आयुक्तांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:16 AM2021-03-13T05:16:35+5:302021-03-13T05:16:35+5:30
लसीकरणाबाबतची माहिती आपणास कशी मिळाली, केंद्रावर आपण कोणासोबत आलात, याबाबतची माहिती संबंधित वृद्धांशी संवाद साधताना आयुक्तांनी जाणून घेतली. कोरोना ...
लसीकरणाबाबतची माहिती आपणास कशी मिळाली, केंद्रावर आपण कोणासोबत आलात, याबाबतची माहिती संबंधित वृद्धांशी संवाद साधताना आयुक्तांनी जाणून घेतली. कोरोना लस घेतल्यानंतर प्रतीक्षालयात बसलेल्या ज्येष्ठ नागरिकाला लस घेताना काही त्रास जाणवला का, याबाबतही त्यांनी विचारणा केली. ही लस पूर्णत: सुरक्षित असून, लस घेण्यास नागरिकांना प्रोत्साहित करा, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले.
कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास अथवा कोरोनाबाधित गृह अलगीकरणात राहत असल्यास त्याचे घर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात येते. वाशिम शहरातील नवीन आययुडीपी कॉलनी व योजना कॉलनी येथे ज्या घरी कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, त्या कंटेन्मेंट झोनला विभागीय आयुक्त सिंह यांनी भेट दिली. गृह विलगीकरणात असलेल्या बाधित रुग्णांशी संवाद साधून गृह विलगीकरणाच्या नियमांचे पालन करा, घरी राहून विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करा व स्वत:ची काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, तहसीलदार विजय साळवे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक मोरे उपस्थित होते.