वाशिममध्ये गुरुवारी पीडित बालकांसाठी विभागीय तक्रार निवारण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 05:47 PM2019-07-31T17:47:51+5:302019-07-31T17:47:57+5:30
वाशिम : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने अमरावती विभागातील बालकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी वाशिम येथे १ आॅगस्ट रोजी तक्रार निवारण शिबीर आयोजित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने अमरावती विभागातील बालकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी वाशिम येथे १ आॅगस्ट रोजी तक्रार निवारण शिबीर आयोजित केले आहे. त्यात विभागातील पाचही जिल्हे सहभागी होणार असून त्यानुषंगाने राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाची चमू वाशिममध्ये दाखल झाली आहे.
राष्ट्रीय बाल हक्क आयोगामार्फत देशात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून बालकांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. दरम्यान, नीती आयोगाने निवडलेल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश असल्याने राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने यंदा वाशिम येथे तक्रार निवारण शिबीर आयोजित केले आहे. रस्त्यावर वास्तव्य करणारी मुले, बालकांची काळजी घेणाऱ्या संस्था, बालगृह, वसतिगृह किंवा इतर ठिकाणी शिक्षण, प्रशिक्षण घेत असलेली किंवा निवासी स्वरूपात राहत असलेली प्रत्येक घटकातील बालके आयोगासमोर स्वत: तक्रार दाखल करू शकतात किंवा बालकांच्यावतीने इतर कोणतीही व्यक्ती तक्रार दाखल करू शकते.
मुलांचे शोषण, त्यांची खरेदी-विक्री, अपहरण, शिक्षण याविषयीच्या तक्रारी, बाल न्याय अधिनियम, बालकांच्या संबधित कायदा, बालविवाह कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा आदींचे उल्लंघन यासह बालकांवर होणाºया अन्याय, अत्याचारविषयक तक्रारी, बालकांचे आरोग्य, काळजी, कल्याण आणि विकास याविषयीच्या तक्रारी या शिबिरामध्ये दाखल करता येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिली.