मूळ प्रमाणपत्रावर ८ टक्के; ‘यूडीआयडी’वर ६८ टक्के

By सुनील काकडे | Published: September 17, 2023 03:23 PM2023-09-17T15:23:45+5:302023-09-17T15:25:02+5:30

अपंगत्वाच्या टक्केवारीत गोंधळ : दिव्यांगांची संघटना आक्रमक

divyang group aggressive 8 percent on original certificate 68 percent on udid | मूळ प्रमाणपत्रावर ८ टक्के; ‘यूडीआयडी’वर ६८ टक्के

मूळ प्रमाणपत्रावर ८ टक्के; ‘यूडीआयडी’वर ६८ टक्के

googlenewsNext

सुनील काकडे, वाशिम : अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार दिव्यांग व्यक्तीला शासनाकडून प्रमाणपत्र दिले जाते. जितकी टक्केवारी अधिक, तितके लाभ अधिक, असा नियम आहे. त्यामुळे अपंगत्वाचे प्रमाण तुलनेने कमी असतानाही अनेकजण यंत्रणेतील भ्रष्टांशी आर्थिक सेटलमेंटद्वारे अधिक टक्केवारीचे प्रमाणपत्र मिळवून शासनाची दिशाभूल करित आहेत. असाच एक प्रकार सवड (ता.रिसोड) येथे उघडकीस आला असून एका महिलेच्या मूळ प्रमाणपत्रावर बहिरेपणाचे प्रमाण ८ टक्के दर्शविण्यात आले; मात्र तिच्याच ‘युनिक डिसॲबिलिटी कार्ड’वर (यूडीआयडी) हे प्रमाण चक्क ६८ टक्के असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात रुद्र अपंग संघटनेने आक्रमक पवित्रा अंगीकारला आहे.

संघटनेचे अध्यक्ष संतोष व्यास यांनी वाशिमच्या जिल्हा शल्य चिकित्सकांकडे दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, रिसोड तालुक्यातील सवड येथील यशोदा गोकुळ सोनुने यांना वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून ४ जानेवारी २०१८ रोजी देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रात ८ टक्के बहिरेपणा असल्याची स्पष्ट नोंद आहे. मात्र, सोनुने यांच्याच ‘यूनिक डिसअ‍ॅबिलीटी कार्ड’मध्ये बहिरेपणाचे प्रमाण ६८ टक्के असल्याची कायमस्वरुपी नोंद करण्यात आली आहे.

तथापि, सोनुने यांचे मूळ प्रमाणपत्र व यूडीआयडी कार्डमध्ये तब्बल ६० टक्क्यांची तफावत आढळून येत असल्याने सदर व्यक्ती बनावट कार्डव्दारे दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेवून शासनाची दिशाभूल करित असल्याचे सिद्ध होत आहे, असे रुद्र अपंग संघटनेचे म्हणणे आहे.
मालेगाव येथेही असाच प्रकार घडला असून तेथील विनोद मंगलचंद रोकडे यांना १३ एप्रिल २०२३ रोजी दिलेल्या प्रमाणपत्रात अपंगत्वाची टक्केवारी कायमस्वरुपी ४५ टक्के नमूद आहे. मात्र, त्याचे कारण संयुक्तिक वाटत नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.

...अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेऊ

बनावट प्रमाणपत्रांव्दारे रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील दोन लाभार्थींसह इतरही अनेकजण शासनाची दिशाभूल करून आर्थिक लाभ लाटत आहेत. त्यामुळे प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात यावी. बोगस प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या दलालांच्या मुसक्या आवळण्यात याव्या; अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल, असा इशारा रुद्र अपंग संघटनेने दिला आहे.

Web Title: divyang group aggressive 8 percent on original certificate 68 percent on udid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम