‘विद्युत रोहित्राजवळ कचरा जाळू नका’ - महावितरणचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 04:05 PM2018-05-25T16:05:14+5:302018-05-25T16:05:14+5:30
वाशिम : महावितरणच्या वीज वाहिन्या किंवा ट्रान्सफार्मर फिडर खांबाजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे विजयंत्रणेला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाशिम : महावितरणच्या वीज वाहिन्या किंवा ट्रान्सफार्मर फिडर खांबाजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे विजयंत्रणेला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी विजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये किंवा जाळू नये, असे आवाहन महावितरणकडून शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले.
शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर खांब, रोहित्र, डीस्ट्रीब्यूशन बॉक्स अशा वीज यंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. तसेच महावितरणच्या डी.पी., खांबाजवळ एखादी दुकान, चहाची टपरी वगैरे उभारली जाते. अशा ठिकाणच्या वीज यंत्रणेजवळ साठवलेल्या कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या भूमिगत केबल व इतर विजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याचा घटना यापूर्वी घडल्या आहेत. सध्या तापमानही खूप वाढत आहे त्यामुळे कचºयास आगी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. विजयंत्रणाही ऊन्हामुळे तापलेली असल्याने अशा प्रकारामुळे धोका वाढतो. शहरातील तसेच जिल्यातील नागरिकांनी उघड्यावर असलेल्या विजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये अशा घटनांमधून वीज यंत्रणेला आग लागल्याचे आढळल्यास तातडीने १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले.