जमिनी देणाºया गावालाच मिळत नाही धरणाचे पाणी!
By admin | Published: April 10, 2017 01:37 PM2017-04-10T13:37:09+5:302017-04-10T13:37:09+5:30
प्रकल्पात पाणी असतानाही दरवर्षी अख्ख्या गावाला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
बोराळा (वाशिम) - गावशिवारात लघूप्रकल्प उभा होणार असल्याने शेती सिंचनाखाली येईल, बारमाही पिके घेता येतील आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकाली निघेल, अशी आशा ठेवून प्रकल्पासाठी गावकऱ्यांनी जमिनी दिल्या. मात्र, प्रकल्पात पाणी असतानाही दरवर्षी अख्ख्या गावाला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. बोराळावासीयांचे हे दुखणे कोण समजून घेणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
मालेगाव तालुक्यातील बोराळा येथे सन १९८९ मध्ये उभारण्यात आलेल्या लघूप्रकल्पामध्ये गावकऱ्यांनी १०० एकर जमिन दिली. त्याबदल्यात त्यांना तुटपूंजा मोबदला मिळाला. त्यामुळे गावातील अनेक शेतकरी अल्पभूधारक, भूमिहिन झाले. गावातील ७० टक्के घरे आजही कच्चा स्वरूपातील असून पावसाळ्यात अनेकांना अतोनात त्रास सोसावा लागतो. गावाशेजारी धरण उभे होवून २५ ते ३० वर्षाचा मोठा कालावधी उलटला; पण आजपर्यंत धरणाचे पाणी गावकऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे गावातील एका छोट्याश्या विहिरीव्दारे मिळणाऱ्या पाण्यावरच गावकऱ्यांना विसंबून राहावे लागत आहे.