कुपनलिका ५०० फूटांपर्यंत खोदूनही पाणी लागेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 02:43 PM2019-05-12T14:43:19+5:302019-05-12T14:43:40+5:30
पाणीपातळी देखील दीड मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याने प्रत्यक्षात असलेली २०० फुटाची मर्यादा ओलांडून ५०० फुटापर्यंत कुपनलिका खोदूनही पाणी लागत नसल्याचे प्रकार काहीठिकाणी घडत आहेत.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात सर्वदूर यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १३१ लघू आणि ३ मध्यम अशा एकूण १३४ प्रकल्पांमध्ये सद्या केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यासोबतच कुपनलिका, हातपंप, विहिरी आदी जलस्त्रोतही आटले आहेत. जमिनीखालची पाणीपातळी देखील दीड मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याने प्रत्यक्षात असलेली २०० फुटाची मर्यादा ओलांडून ५०० फुटापर्यंत कुपनलिका खोदूनही पाणी लागत नसल्याचे प्रकार काहीठिकाणी घडत आहेत.
जिल्ह्यात दरवर्षीच्या पावसाळ्यात सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो; मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यात सातत्य नाही. वाशिम जिल्ह्याचे भूगर्भीय क्षेत्र मुख्यत: ‘दख्खन बस्तर लाव्हा’ या प्रकारच्या खडकाचे आहे. पूर्णपणे ‘बेसॉल्ट’ने आच्छादित या जिल्ह्यात काही ठिकाणी विघटित, तर काही ठिकाणी ‘व्हेसिक्युकर झिओलिटिक प्रस्तर’ची झीज झाली आहे. यामुळे पडलेल्या भेगांमुळे सच्छिद्रता निर्माण होऊन भूजल साठा वाढण्यास मदत मिळते; परंतु पावसाची प्रत्यक्ष सरासरी ही कागदावर मोठी दिसत असली तरी, गेल्या काही वर्षांत जमिनीत मुरणारा पाऊस झालेला नाही. त्यामुळे जमिनीखालच्या पाणीपातळीवर प्रचंड परिणाम झाला असून उन्हाळ्यात त्याची गंभीरता दिसून येत आहे.
सद्य:स्थितीत जमिनीखालची पाणीपातळी दीड मीटरपेक्षाही अधिक खोलवर गेल्याने मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात कुपनलिका खोदूनही पाणी लागणे कठीण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे पैसे व्यर्थ खर्च होण्यासोबतच कुपनलिका खोदताना भूजल अधिनियमाची सर्रास पायमल्ली सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यात सद्या भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी देखील आपली नैतिक जबाबदारी समजून याकामी प्रशासनाला सहकार्य करण्यासोबतच नियमबाह्य पद्धतीने कुपनलिकांचे खोदकाम करू नये.
- ऋषीकेश मोडक
जिल्हाधिकारी, वाशिम
नियमबाह्य पद्धतीने अधिक खोलवर कुपनलिका घेणे, ठराविक अंतराची मर्यादा न पाळता मन मानेल त्या अंतरावर कुपनलिकांसाठी खोदकाम करण्याच्या प्रकारामुळे जमिनीखालची पाणीपातळी दिवसागणिक खोलवर चालली आहे. मात्र, या गंभीर प्रकारावर निर्बंध लादण्यासाठी सद्यातरी प्रशासकीय पातळीवर पुरेशा मनुष्यबळासह अन्य ठोस व्यवस्था नाही.
- एस.एस. कडू, वरिष्ठ भुजल वैज्ञानिक