बीडीओ देता का बीडीओ, रिकाम्या खुर्चीला घातला हार
By दिनेश पठाडे | Published: August 18, 2023 07:03 PM2023-08-18T19:03:26+5:302023-08-18T19:03:37+5:30
मालेगाव पंचायत समिती १७ दिवसांपासून बीडीओ विना
दिनेश पठाडे, वाशिम: मालेगाव पंचायत समितीचा कारभार गत १७ दिवसांपासून गटविकास अधिकारी यांच्या विना चालत आहे. कायमस्वरुपी गटविकास अधिकारी मिळत नसल्याने ग्रामीण जनतेची कामे खोळंबली आहेत. यामुळे शिवसेना(उबाठा) आक्रमक झाली असून शुक्रवारी बीडीओंच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत कायमस्वरूपी गटविकास अधिकारी देण्याची मागणी केली.
गटविकास अधिकारी काळबांडे हे ३१ जुलैला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर गटविकास अधिकारी नियुक्त करणे क्रमप्राप्त असतानाही अजूनही पंचायत समितीला कायमस्वरूपी तर सोडा, प्रभारी गटविकास अधिकारी मिळाला नसल्याची स्थिती आहे. यामुळे विकासात्मक कामे खोळंबली असून वैयक्तिक कामे देखील होत नसल्याचे दिसते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्या खुर्चीला पुष्पहार घालून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख उद्धव पाटील गोडे, शिवसेनेचे भगवान बोरकर, अनिल शिंदे, अनुज चरखा, गजानन बोरचाटे, सरपंच विजय शेंडगे, भारत नप्ते, विनायक बेंगाळ यांची उपस्थिती होती. दरम्यान, येत्या दोन दिवसात मालेगाव पंचायत समितीला गट विकास अधिकारी मिळाले नाही तर पंचायत समिती कार्यालयाला ताला ठोकू अशी माहिती तालुकाप्रमुख उद्धव पाटील, उपतालुकाप्रमुख भगवान बोरकर यांनी दिली.