जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना वेळेचा विसर
By admin | Published: June 6, 2017 01:06 AM2017-06-06T01:06:28+5:302017-06-06T01:06:28+5:30
रुग्णांची हेळसांड: बहुतेक कक्ष उघडतात उशिरा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: विविध आजारांवर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांची उशिरापर्यंत प्रतिक्षा करावी लागत असल्याची बाब सोमवारी लोकमतकडून करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले आहे. सांयकाळी ५ वाजता या ठिकाणी ओपीडी आणि इतर एक दोन कक्ष वगळता बहुतेक कक्षात डॉक्टर किंवा संबंधित कर्मचारीच उपस्थित नसल्याचे दिसून आले.
गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी शासनाच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातील विविध ठिकाणचे रुग्ण उपचारासाठी येतात. आजारावर उपचार व्हावा, डॉक्टरांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन करावे, अशी त्यांची रास्त अपेक्षा असते. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यासाठी वेळाही निश्चित करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांच्या वेळाही निश्चित करण्यात आल्या आहेत. सकाळच्या सत्रानंतर सायकांळच्या सत्रात ५ वाजतापासून बाह्यरुग्ण कक्ष (ओपीडी)सह औषधी वितरण कक्ष, तपासणी कक्षासह इतर कक्ष सुरू केले जातात. त्यासाठी नियोेजित वेळेत आपली तपासणी होऊन उपचार करण्यात यावे म्हणून अनेक रुग्ण रुग्णालयाच्या आवारात आधीपासूनच प्रतिक्षा करीत असतात. हा क्रम नित्यु सुरू आहे, की नाही याची पडताळणी करण्यासाठी लोकमतच्या चमूकडून सोमवार ५ जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्टिंग आॅपरेशन करण्यात आीले. त्यावेळी नेहमीप्रमाणे अनेक रुग्ण संबंधित डॉक्टर व इतर रुग्णांची प्रतिक्षा करीत होते. नियोजित वेळी ओपीडीसाठी रुग्णांची नोंदणीही सुरू झाली; परंतु रुग्ण नोंदणी कक्ष आणि इतर एक दोन कक्ष वगळता काही कक्ष बंद होते. तपासणी कक्षाबाहेर अनेक रुग्ण चिठ्ठ्या हाती घेऊन डॉक्टर लोकांची प्रतिक्षा करताना दिसले, तर काही रुग्ण औषध वितरण कक्षासमोर प्रतिक्षा करीत असलेले आढळले. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर आणि संबंधित कर्मचाऱ्यांना वेळेचे भान नसल्याचे स्पष्ट झाले. त्याचा फटका मात्र रुग्णांना सहन करावा लागत आहे.