वयाच्या चाळिशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:48 AM2021-08-18T04:48:35+5:302021-08-18T04:48:35+5:30
वाशिम : वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळविणे अधिक सोयीचे व्हावे याकरिता परिवहन विभागाने ऑनलाइन पद्धती अमलात आणली आहे. ...
वाशिम : वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळविणे अधिक सोयीचे व्हावे याकरिता परिवहन विभागाने ऑनलाइन पद्धती अमलात आणली आहे. घरबसल्या ऑनलाइन लायसन्स काढले जात असून, वयाच्या चाळिशीनंतर वाहन परवाना काढायचा असेल किंवा त्याचे नूतनीकरण करायचे असेल तर एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरचेच ऑनलाइन प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
कोरोना काळात गत दीड वर्षापासून वाहन चालक परवाना काढणे, वाहन नोंदणी यासह वाहनविषयक कामे प्रभावित झाली होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने जुलै महिन्यापासून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे कामकाज पूर्ववत झाले आहे. दरम्यान लर्निंग लायसन्स काढण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून ऑनलाइन पद्धती अमलात आणली आहे. दैनंदिन सरासरी ३५ ते ४० ऑनलाइन लर्निंग लायसन्स दिले जातात. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी किंवा त्याचे नूतनीकरण करण्यासाठी एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरचेच प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार इतर डॉक्टरांचे प्रमाणपत्र आता चालणार नाही.
००००००००
लर्निंग लायसन्स ऑनलाइन!
परिवहन विभागाच्या सारथी पोर्टलवर जाऊन उमेदवारांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने ठरवून दिलेले नियमानुसार शुल्क भरून ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. त्यानंतर ऑनलाइन परीक्षा घेऊन लर्निंग ऑनलाइन लायसन्स काढता येते. ज्यांना ऑनलाइन लायसन्स काढता येत नाही ते ऑनलाइन लायसन्स काढण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात गर्दी करतात. दैनंदिन सरासरी ३५ ते ४० लर्निंग लायसन्स दिले जातात. गत महिनाभरात जवळपास एक हजार जणांना लायसन्स देण्यात आले.
०००००
१८ वर्षांनंतर मिळते लायसन्स
वाहन चालविण्याचा परवाना घेण्यासाठी संबंधित उमेदवाराने वयाचे १८ वर्षे पूर्ण करणे आवश्यक आहे. १८ वर्षांनंतर कुणीही लायसन्स काढू शकतो. वाहन चालविण्याकरिता उमेदवार फिट असल्याचे प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले असणे आवश्यक आहे.
०००००
एका डॉक्टरला दिवसाला २० प्रमाणपत्र देता येणार
वयाच्या चाळिशीनंतर लायसन्स काढण्याकरिता एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार असल्याचे पत्र परिवहन विभागाने आरटीओला पाठविले आहे. आरटीओकडे इच्छुक डॉक्टरांनी संपर्क केला तर त्यांना आरटीओच्या वतीने अधिकृत प्रमाणपत्र देण्याकरिता युजर आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे. एका डॉक्टराला दिवसाला २० प्रमाणपत्र देता येणार आहेत.
०००००००००
कोट
आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने लर्निंग लायसन्स काढता येणार आहे. वयाच्या चाळिशीनंतर एमबीबीएस डॉक्टरांचे तपासणीचे वैद्यकीय प्रमाणपत्र लायसन्स काढताना बंधनकारक लागणार आहे. दिवसाला सरासरी ३५ ते ४० ऑनलाइन लर्निंग लायसन्स दिले जातात.
- ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम.