पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस घेण्यास डॉक्टर, आरोग्य कर्मचारी उत्सुक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 11:15 AM2021-01-06T11:15:29+5:302021-01-06T11:17:37+5:30
Corona vaccine News जिल्ह्यातील डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी मात्र ही लस घेण्यास उत्सुक असल्याचे दिसून येते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना लस लवकरच येण्याची शक्यता असून, पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून सेवा बजावणारे डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. साइड इफेक्टच्या भीतीमुळे अन्य काही जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ही लस घेण्यास डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक असली तरी जिल्ह्यातील डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी मात्र ही लस घेण्यास उत्सुक असल्याचे दिसून येते.
देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून सरकारी व खासगी क्षेत्रातील ५३२४ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सरकारी डाॅक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या ३८९०, तर खासगी डाॅक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या १४३४ अशी आहे.
या फ्रंटलाइन वर्कर्सला पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना लसीचे काही साइड इफेक्ट होऊ शकतात, अशी भावना अन्य जिल्ह्यातील काही डाॅक्टर, कर्मचाऱ्यांची झाल्याने पहिल्या टप्प्यात लस घेण्याची धाकधूक आहे. हा धागा पकडून जिल्ह्यातील सरकारी व खासगी डाॅक्टरांची मते जाणून घेतली असता, पहिल्या टप्प्यात कोरोना लस घेण्यास काहीच हरकत नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
आगामी काळात कोरोना लस उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नियोजन केले जात आहे. सरकारी व खासगी डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे.
- डाॅ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी
कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येतात. कोरोना लस लवकरच येणार, असे सांगण्यात येत आहे. कोरोना लस घेण्यास जिल्ह्यात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा विरोध नाही.
- डाॅ. अनिल कावरखे,
इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष