पीपीई कीटमुळे बिघडतेय डॉक्टर, परिचारिकांचे आरोग्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:18 PM2020-09-30T12:18:49+5:302020-09-30T12:19:02+5:30
पीपीई कीट व मास्कमुळे त्वचेच्या समस्याही निर्माण होतात, असे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. विठ्ठल गोटे यांनी सांगितले.
वाशिम : कोरोनारुग्णांच्या उपचारार्थ सलग सहा ते आठ तास पीपीई कीट घालून सेवा देणाऱ्या डॉक्टरांचेच आरोग्य धोक्यात सापडत आहे. या काळात या डॉक्टरांना ना लघुशंकेला जाता येत, ना पाणी पिता येत. श्वास घेण्यातही अडचणी येत आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालय यासह तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर, एक खासगी कोविड हॉस्पिटल येथे रुग्णांवर उपचार केले जात असून, येथे कार्यरत डॉक्टरांना तसेच परिचारिका, आरोग्य कर्मचारी, चाचणी करणारे तंत्रज्ञ आदींनाही संरक्षणासाठी व संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून शासनाकडून लॅमिनेटेड कीट व एन-९५ मास्क पुरविण्यात आले. पीपीई कीट घालून डॉक्टर, कर्मचारी हे रुग्णसेवेत कार्यरत असताना अनेक समस्यांचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पीपीई कीट व मास्कमुळे त्वचेच्या समस्याही निर्माण होतात, असे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. विठ्ठल गोटे यांनी सांगितले.
सरकारी कोविड रुग्णालयांमध्ये डॉक्टर, कर्मचाऱ्यांना आठ तास सेवा द्यावी लागते. या कालावधीत पीपीई कीट घालून राहावे लागते. घाम येणे, लघुशंकेला जाता न येणे, कान व नाकावर व्रण येणे आदी थोड्याफार समस्या जाणवतात.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी
सतत सहा ते आठ तास पीपीई कीट घातल्यामुळे श्वास घेण्यातही काही प्रमाणात अडचणी येतात. या कालावधीत पाणी पिता येत नाही किंवा लघुशंकेला जाता येत नसल्याने डिहायड्रेशन, किडनीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- डॉ. अनिल कावरखे,
अध्यक्ष, आयएमए वाशिम