कोरोनाकाळात घटले डॉक्टरांचे वजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:46 AM2021-05-25T04:46:07+5:302021-05-25T04:46:07+5:30
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेस जिल्ह्यात साधारणत: १५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. तोपर्यंत जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांचा एकूण आकडा केवळ ...
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेस जिल्ह्यात साधारणत: १५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. तोपर्यंत जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांचा एकूण आकडा केवळ ७ हजार ३३९ होता; मात्र गेल्या तीन महिन्यांच्या काळात त्यात तब्बल ३० हजार ९०२ (२३ मे अखेर) नव्या रुग्णांची भर पडली आहे. १५ फेब्रुवारीला केवळ १२० ॲक्टिव्ह रुग्ण होते; तर २३ मे रोजी ही संख्या ३३५७ वर पोहोचली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे. यामुळे सतत धावपळ करावी लागत असल्याने अनेक डाॅक्टरांचे वजन कमी झाले; तर काहींनी योगासन, प्राणायाम, व्यायामाव्दारे स्वत:च वजन कमी करून घेतले.
.....................
जिल्हा रुग्णालय -
डॉक्टर्सची संख्या - ३२
आरोग्य कर्मचारी - १५०
...............
कोट :
गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. दुसरीकडे कोरोना चाचण्यांचेही प्रमाण वाढविण्यात आले. याशिवाय, इतरही आजारांमधील रुग्णांवर नेहमीप्रमाणे उपचार करावे लागत आहेत. परिणामी, कामाचा व्याप वाढल्याने माझ्या वजनात घट झाली आहे.
- डाॅ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम
............
कोरोना संसर्गाने बाधित होणाऱ्या गोरगरीब कुटुंबांतील रुग्णांना खासगी दवाखान्यांमधील खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे ते थेट शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होऊन उपचार घेत नसल्याने निश्चितपणे कामाचा व्याप वाढला आहे. दैनंदिन धावपळ करावी लागत असल्याने स्वत:च्या वजनात घट झाली आहे.
- डाॅ. अनिल कावरखे
वैद्यकीय अधिकारी, जि.सा.रु., वाशिम
..............
कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णांना उपचाराची दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी सातत्याने धावपळ करावी लागत आहे. यादरम्यान स्वत:ला काही धोका होऊ नये, याचीही काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे दैनंदिन योगासन, प्राणायाम आणि इतर व्यायामांव्दारे ‘फिट’ राहण्याचा प्रयत्न करत आहे.
- डाॅ. बालाजी हरण
इन्चार्ज, ट्रू नॅट लॅब, जि.सा.रु., वाशिम
.............
(बॉक्स)
आहाराची घेतात काळजी
कोरोनाच्या संकटकाळात कामाचा व्याप तुलनेने वाढलेला आहे. यामुळे ताणतणावापासून दूर राहण्यासोबतच डाॅक्टर्स मंडळी विशेषत: संतुलित आहारावर विशेष भर देत आहेत. दररोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश, मोड आलेले कडधान्य, सफरचंद, चिकू, टरबूज, खरबूज यासारख्या फळांचे सेवन नित्यनेमाने केले जात असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.