रक्तदान करा; अन्यथा रक्त मिळणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:28 AM2021-06-26T04:28:17+5:302021-06-26T04:28:17+5:30
वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय आणि वाशिम शहरातच एक खासगी अशा दोन रक्तपेढ्या आहेत. त्यात २५ जून रोजी ...
वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय आणि वाशिम शहरातच एक खासगी अशा दोन रक्तपेढ्या आहेत. त्यात २५ जून रोजी केवळ ८५ रक्त पिशव्या उपलब्ध होत्या. हा अत्यल्प रक्तसाठा दोन दिवसही पुरण्याची शक्यता नाही. त्यामुळे समाजातील रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, अन्यथा गंभीर आजारातील रुग्ण व अपघातग्रस्तांना रक्तच मिळणार नाही, अशी एकूण स्थिती निर्माण झाली आहे.
वाशिम शहरातील दोन्ही रक्तपेढ्यांमध्ये कधीकाळी रक्ताचा मुबलक साठा उपलब्ध असायचा. मात्र, जिल्ह्यात गतवर्षीपासून उद्भवलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात हे प्रमाण सातत्याने घटत चालल्याचे दिसून येत आहे. सिकलसेल, थॅलेसेमिया यासारखे गंभीर व दुर्मीळ आजार जडलेल्या रुग्णांना प्रत्येक महिन्याला रक्त द्यावे लागते. याशिवाय प्रसूतीदरम्यान अधिक रक्तस्राव झाल्यास, अपघातांमध्ये गंभीर जखमी झाल्यास संबंधितांनाही रक्ताची गरज भासते. रक्त वेळेवर मिळाले नाही तर अनेकांना प्राणासही मुकावे लागते. असे असताना वाशिम शहरातील दोन्ही रक्तपेढ्यांमध्ये आजमितीस रक्ताची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे. ही बाब लक्षात घेता रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
...................
कोट :
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून यापूर्वी अनेक वेळा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यास बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. मात्र, रक्तदानाच्या प्रमाणात पूर्वीच्या तुलनेत परिणामकारक घट झालेली आहे. जिल्हा रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत २५ जूनअखेर रक्ताच्या केवळ १५ पिशव्या उपलब्ध आहेत. रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.
- डाॅ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम