‘कोरोना’चे वाहक होऊ नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:42 AM2021-04-16T04:42:01+5:302021-04-16T04:42:01+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याची स्थिती धोकादायक वळणावर येऊन ठेपत असल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याची स्थिती धोकादायक वळणावर येऊन ठेपत असल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध जाहीर केले आहेत. शासनाचे निर्बंध हे मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असून, याचे पालन प्रत्येकाने केल्यास निश्चितच कोरोनाचा आलेख खाली आल्याशिवाय राहणार नाही. कोरोना विषाणू संसर्गाचे निदान लवकर झाले तर संबंधित रुग्ण लवकरात लवकर बरा होऊ शकतो. त्यामुळे सर्दी, ताप किंवा अन्य कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येताच चाचणी करणे आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक आहे. आजच्या स्थितीत काही जण सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असतानाही कोरोना चाचणी करण्यास विलंब करतात. त्यांना चाचणीचा सल्ला दिल्यानंतरही ‘मला काही झाले नाही, औषधोपचार द्या, त्यानेच ठीक होईल’ अशी कारणे सांगून चाचणी करण्यास टाळाटाळ करतात आणि कुटुंबात वावरतात. त्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यांनादेखील कोरोना संसर्ग होतो. वेळेवर चाचणी न केल्यामुळे योग्य औषधोपचार वेळेत मिळत नाहीत. परिणामी, एखाद्या वेळी प्रकृती गंभीर बनू शकते. त्यामुळे सर्दी, खोकला आदी लक्षणे दिसताच तातडीने चाचणी केली तर रुग्णही लवकर बरा होतो आणि त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचे प्रमाणही नगण्यच असते. त्यामुळे नागरिकांनी आता तरी ही बाब गांभीर्याने घेऊन दक्षता घेतली तर कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यास फारसा वेळ लागणार नाही. कोरोनाचे वाहक ठरणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घेणे आज काळाची गरज ठरत आहे.
- डॉ. प्रवीण ठाकरे
छातीरोग तज्ज्ञ, वाशिम