हक्कासाठी रडू नका तर जोमाने लढा - सुषमा अंधारे
By संतोष वानखडे | Published: October 29, 2023 06:06 PM2023-10-29T18:06:12+5:302023-10-29T18:06:25+5:30
बोगस जात प्रमाणत्र व व्हॅलिडीटीप्रकरणी पुन्हा एसआयटी कार्यान्वित करण्याचा मुद्दा येत्या हिवाळी अधिवेशनात लावून धरू, असे आश्वासन अंधारे यांनी दिले.
वाशिम : सर्व बाबतीत मागासलेल्या समाजाने पुढे यावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिले. काही बोगस भामटे पुन्हा घुसखोरी करू पाहत आहे. अशा भामट्याविरुद्ध उपोषण करून रडत बसण्यापेक्षा जोमाने लढा, असा सल्ला शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रविवारी (दि.२९) पोहरादेवी (ता.मानोरा) येथे दिला.
२९ ऑक्टोबर रोजी त्या पोहरादेवीत आल्या असता, बोलत होत्या. यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार राजेश राठोड, माजी मंत्री संजय देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बोगस जात प्रमाणत्र व व्हॅलिडीटीप्रकरणी पुन्हा एसआयटी कार्यान्वित करण्याचा मुद्दा येत्या हिवाळी अधिवेशनात लावून धरू, असे आश्वासन अंधारे यांनी दिले.
यावेळी खासदार अरविंद सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांपूर्वी पंतप्रधान झाल्यावर बंजारा समाजाला आदिवासी जातीत समावेश करू असे शब्द दिले होते. नऊ वर्ष झाले तरी आश्वासनपूर्ती झाली नाही, असा आरोप केला. प्रास्ताविक डॉ श्याम जाधव यांनी तर आभार सुनील महाराज यांनी मानले.