वृक्ष लागवडीचे पैसे मिळालेच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 01:48 PM2020-01-22T13:48:31+5:302020-01-22T13:48:47+5:30
०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची मजूरी संबंधित मजुरांना तीन वर्षानंतरही मिळाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रिसोड तालुक्यातील चिखली-कवठा या मार्गालगत २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची मजूरी संबंधित मजुरांना तीन वर्षानंतरही मिळाली नाही. याप्रकरणी चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवालासह चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी उत्तम फड यांनी रिसोड वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांना २० जानेवारी रोजी दिले.
पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी गत काही वर्षांपासून वृक्षारोपण मोहिम राबविली जात आहे. सन २०१४-१५, २०१५-१६ आणि २०१६-१७ या कालावधीत रिसोड तालुक्यातील चिखली ते कवठा या मार्गालगत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केल्यानंतर मजुरांना मजुरीचे पैसे मिळणे अपेक्षीत होते. परंतू, अद्यापही पैसे मिळाले नाहीत. यासंदर्भात युवरात सिताराम भगत यांनी तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावरही अनेक वेळा तक्रारी केल्या. परंतू, त्याची दखल घेण्यात आली नाही. शेवटी भगत यांनी मुख्य वनसंरक्षक यवतमाळ यांच्याकडे तक्रार करताच, जलदगतीने चौकशीची चक्रे फिरली. याप्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश मुख्य वनसंरक्षकांनी वाशिमच्या सामाजिक वनीकरण विभागाला दिले. त्यानुसार विभागीय वनअधिकारी फड यांनी याप्रकरणी रिसोड वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांसह संबंधितांना चौकशी करण्याचे निर्देश २० जानेवारी रोजी दिले. २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीतील वृक्षारोपणाची मजुरी संबंधितांना अद्याप मिळाली नाही, याप्रकरणी सविस्तर चौकशी करावी, अहवाल सादर करावा, असे निर्देश फड यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)