‘म्युकरमायकोसिस’कडे दुर्लक्ष नको, वेळीच उपचार घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:40 AM2021-05-23T04:40:57+5:302021-05-23T04:40:57+5:30

वाशिम : कोरोनातून बऱ्या झालेल्या काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) आजाराचा संसर्ग दिसून येत आहे. नागरिकांनी या आजाराकडे ...

Don’t ignore ‘mucormycosis’, treat it on time | ‘म्युकरमायकोसिस’कडे दुर्लक्ष नको, वेळीच उपचार घ्या

‘म्युकरमायकोसिस’कडे दुर्लक्ष नको, वेळीच उपचार घ्या

Next

वाशिम : कोरोनातून बऱ्या झालेल्या काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) आजाराचा संसर्ग दिसून येत आहे. नागरिकांनी या आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे.

म्युकरमायकोसिस हा एक प्रकारचा बुरशीजन्य आजार आहे. हा तुलनेने दुर्मीळ पण गंभीर आजार आहे. झिगॉमायकोसिस म्हणून या आजारास ओळखले जाते. एखादा आजार जडल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर हे संक्रमण बहुतेक वेळा दिसून येते. रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या रुग्णांमध्ये याचा संसर्ग जास्त प्रमाणात होतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बाधित झालेल्यांवर उपचारादरम्यान रेमडेसिवर, स्टेरॉइड व अँटिबायोटिक्सच्या वापराच्या दुष्परिणामामुळे त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार दिसून येत आहे. म्युकरमायकोसिस हा आजार म्युकोर्मिटाइड मोल्ड्सच्या संपर्कातून उद्भवतो. हे मोल्ड्स झाडाची पाने, कंपोस्टचे ढीग, माती, सडणारे लाकूड यात आढळतात. हे प्रभावित मोल्ड श्वसन यंत्रणेस संसर्गित करतात व त्यातून म्युकरमायकोसिस आजार उद्भवतो. याला फुप्फुसीय संसर्ग म्हणून संबोधले जाते. केंद्रीय मज्जासंस्था, डोळे, चेहरा, फुप्फुसे, सायनस, त्वचेवरील जखम किंवा भाजलेली जखम (त्वचेच्या संसर्गातून) या माध्यमातून हे संक्रमण पसरते. भाजलेली जखम, कापलेली जखम आणि खरचटलेली जखम, कर्करोग, अलीकडील अवयव प्रत्यारोपण, मधुमेह (विशेषत: जर योग्यरीत्या उपचार केला जात नसेल तर), शस्त्रक्रिया, एचआयव्ही किंवा एड्स त्वचेच्या संसर्गासह, आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात म्युकरमायकोसिस संसर्गित करू शकतो. हा सुरुवातीला त्वचेच्या माध्यमातून उद्भवू शकतो. नंतर दुर्लक्ष झाल्यास गतीने दुसऱ्या भागातही हा संसर्ग पसरू शकतो.

वेळीच निदान आणि उपचार केल्यामुळे या आजारामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम टाळता येतात. यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग काळात उपचारादरम्यान स्टेरॉइडचा वापर आवश्यक तेवढाच गरजेचा आहे. अतिरिक्त वापर टाळणे अत्यावश्यक. प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक्स) तारतम्याने वापर आवश्यक आहे. या आजारावरील उपचारासाठी अँटी फंगल ट्रीटमेंटची गरज असेल तर सर्जरी करून बाधित झालेला भाग काढला जातो. यासाठी दंत शल्यचिकित्सक, ओरल आणि मॅकझिलोफेशियल सर्जन, कान-नाक-घसातज्ज्ञ, न्यूरोसर्जन व फिजिशियन यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे डॉ. मधुकर राठोड यांनी

सांगितले. ००००

संसर्ग टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

म्युकरमायकोसिस हा संक्रमित होणारा आजार नाही. संक्रमित व्यक्तीकडून तो आजार दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकत नाही. या प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी स्वतःची काळजी घेणे, वैयक्तिक स्वच्छतेकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती कमी असल्यास, घराबाहेर स्वत:ला सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही ठिकाणी काम करताना मास्क घातल्यास आणि पूर्ण बरे होईपर्यंत सर्व जखमांवर नियमित मलमपट्टी करीत राहिल्यास बुरशीजन्य संसर्ग रोखणे शक्य होईल. उन्हाळ्यात आणि शरद ऋतूतील महिन्यांमध्ये अतिरिक्त सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण या वातावरणात बुरशीचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा, असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी केले आहे.

Web Title: Don’t ignore ‘mucormycosis’, treat it on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.