नका पाहू पालकांच्या सहनशीलतेचा अंत; प्रत्यक्ष शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना करा शांत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:47 AM2021-09-15T04:47:36+5:302021-09-15T04:47:36+5:30
वाशिम : जिल्ह्यातील वर्ग एक ते सातपर्यंतच्या जिल्हा परिषद तसेच इतर सर्व खासगी प्राथमिक शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे ...
वाशिम : जिल्ह्यातील वर्ग एक ते सातपर्यंतच्या जिल्हा परिषद तसेच इतर सर्व खासगी प्राथमिक शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे तसेच पालकांच्या सहनशीलतेचाही अंत होत असल्याचा मुद्दा समोर करीत प्राथमिक शाळा विनाविलंब सुरू कराव्यात,या मागणीसाठी जिल्हा परिषद शाळा बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी आदींना १४ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. शाळा सुरू न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा व इतर सर्वच खासगी प्राथमिक शाळा बंद आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने माध्यमिक वर्ग सुरू केले आहेत; मात्र इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक वर्ग सुरू केले नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्ह्यातील विविध गावात व शहरात असलेल्या जिल्हा परिषद शाळा ७७५ आहेत. तसेच इतर खासगी शाळांचीही संख्या मोठी आहे. या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात असल्याने तसेच गावखेड्यांमध्ये संपूर्ण जनजीवन सुरळीत सुरू असल्याने सर्वच पालकांना शाळा सुरू होऊन आपल्या मुलांना शिक्षण मिळावे असे वाटत आहे. गावखेड्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना ऑनलाइन शिक्षण फार दूरची बाब आहे. त्यामुळे खेड्यातील विद्यार्थी पूर्णपणे शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जात आहे. याबाबत जिल्हा परिषद शाळा बचाव समितीच्या वतीने बऱ्याच गावातील पालकांशी चर्चा केल्या आहेत. या माध्यमातून शाळा सरसकट सुरू व्हाव्यात अशीच सर्व पालकांची मागणी आहे. त्यामुळे पालकांच्या मागणीच्या अनुषंगाने वर्ग पहिली ते सातवीच्या प्राथमिक जिल्हा परिषद शाळा तसेच इतर सर्व खासगी शाळा विनाविलंब सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली. शासनाने पालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. निवेदनावर जिल्हा परिषद शाळा बचाव समितीचे संयोजक गजानन धामणे, सामाजिक कार्यकर्ते तथा पालक गणेश नाना शिंदे, कवी साहित्यिक महेंद्र ताजने, अनिल शिंदे, प्रा. मंगेश भुताडे, संतोष आसोले, शेख इसाक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
००००००
टप्प्याटप्प्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन
निवेदनाची दखल न घेतल्यास शासनाच्या विरोधात टप्प्याटप्प्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेनुसार सर्वांना शिक्षण घेण्याची समान संधी असली तरी कोरोना काळात सर्व निर्बंध शिथिल झाले असताना कोरोनाच्या आड केवळ शाळा बंद ठेवून बहुजनांना ज्ञानवंचित ठेवण्याचा डाव तर नाही ना? असा आरोप जिल्हा परिषद शाळा बचाव समितीचे संयोजक तथा सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी केला.