दलित वस्त्यांच्या कामांना ‘ठेंगा’
By admin | Published: October 27, 2014 01:07 AM2014-10-27T01:07:00+5:302014-10-27T01:08:36+5:30
आढावा बैठका ठप्प : वाशिम जिल्हाधिका-यांचे आदेशही बासनात.
वाशिम : २00४-0५ पासून प्रलंबित असलेल्या दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत असलेल्या कामांना पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासन केवळ ह्यठेंगाह्णच दाखविण्याचे काम करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रारंभी आढावा बैठका घेणार्या प्रशासनाने गत पाच-सहा महिन्यांपासून प्रलंबित कामांचा आढावाही घेतला नसल्याने प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. दलित वस्त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी निघालेल्या शासनाला त्यांच्याच प्रशासनातील काही महाभाग मागे ओढत असल्याचे धक्कादायक वास्तव सामाजिक कार्यकर्ते राजकुमार पडघान यांनी माहिती अधिकारातून समोर आणले होते. दलित वस्त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत विविध कामांसाठी लाखो रुपयांचा निधी शासनस्तरावरून उपलब्ध करून दिला जातो. हा निधी इतरत्र न वळविण्याचे बंधनही टाकण्यात आले आहे. दलित वस्तीमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करणे, पाणीपुरवठय़ाची सुविधा म्हणून विहीर आणि पाइप लाइन टाकणे तसेच पाण्याची टाकी बांधणे, हातपंप घेणे, समाजमंदिर बांधणे आदी कामे करण्यासाठी लाखो रुपयांची तरतूद केली जाते. निधीही तत्काळ उपलब्ध करून दिला जातो. मात्र, कामाला विलंबाने सुरुवात होणे, शिवाय तीन-चार वर्षातही सदर काम पूर्णत्वाकडे जाईलच, याची कोणतीही शाश्वती नसते. वाशिम तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत गत १0 वर्षात किती कामे मंजूर झाली, एकूण निधी किती आणि खर्च किती, कामाची स्थिती काय, याबाबत राजकुमार पडघान यांनी माहिती अधिकारातून माहिती मागितली होती. या माहितीनुसार, २00४-0५ मध्ये एकूण २७ ग्रामपंचायतींमध्ये पाणीपुरवठय़ाची कामे मंजूर झाली होती. विहीर, पाइप लाइन, बोअर, पाणी टाकी आदी कामांसाठी लाखो रुपयांचा निधीही देण्यात आलेला आहे. तरीही १२ ग्रामपंचायतींमधील दलित वस्त्यांमध्ये नळ योजनेचे पाणी पोहोचू शकले नसल्याची शोकांतिका आहे.