चालकांनो, आता हेल्मेट घेऊनच घराबाहेर पडा, जिल्ह्यात हेल्मेट सक्ती बुधवारपासून
By दिनेश पठाडे | Published: February 27, 2023 03:48 PM2023-02-27T15:48:40+5:302023-02-27T15:49:35+5:30
Helmet Compulsory Washim: वाशिम जिल्ह्यात १ मार्चपासून दुचाकीचालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक असणार आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांचा रस्ता अडवून त्यांना पुन्हा घरी पाठविले जाणार आहे.
वाशिम : जिल्ह्यात १ मार्चपासून दुचाकीचालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक असणार आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांचा रस्ता अडवून त्यांना पुन्हा घरी पाठविले जाणार आहे. त्यामुळे बुधवारपासून हेल्मेट घेऊनच घराबाहेर पडणे हिताचे असणार आहे. जिल्ह्यातील अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे गतवर्षात समोर आले आहे. त्यामुळे या वर्षात अपघात कमी करण्यासाठी जिल्हा प्रादेशिक परिवहन विभागाकडून मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्याच धर्तीवर दुचाकीचालकांना हेल्मेट सक्ती केली जाणार आहे.
यापुढे १ मार्च २०२३ पासून वाशिम शहर व जिल्ह्यातील इतर ५ तालुक्यांतील मुख्य व इतर सर्व रस्त्यांवर दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात गत वर्षात झालेल्या एकूण अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये ७० टक्के मृत्यू डोक्याला मार लागल्यामुळे झाले आहेत. त्यामध्ये दुचाकीचालक आणि पाठीमागे बसलेल्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाकडून मोटार वाहन नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरुद्धच्या कारवाईमध्ये वाढ करण्यात येणार आहे. दुचाकीस्वारांनी चांगल्या प्रतीचे हेल्मेट परिधान करूनच प्रवास करावा. अन्यथा सदर दुचाकी चालकावर मोटार वाहन कायद्यानुसार दंड व अनुज्ञप्ती निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. तसेच त्यास समुपदेशन केल्यानंतर त्याला पुढील प्रवास करू न देता, परत पाठवून हेल्मेट परिधान केल्यानंतरच पुढील प्रवासाची अनुमती देण्यात येणार आहे.
कडक कारवाईचे आदेश
परिवहन विभाग कार्यालयातील वायुवेग पथकाद्वारे मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्याकडून हेल्मेट तपासणीबाबत सध्या सुरू असलेल्या कारवाईपेक्षा कडक कारवाई करण्याचे निर्देश पथकातील कर्मचाऱ्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिले आहेत.
...तर जावे लागे पुन्हा माघार
जिल्ह्यात उद्यापासून हेल्मेट सक्ती मोहीम राबविली जाणार आहे. हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकीवरील व्यक्तींना पुढे जाऊ दिले जाणार नाही. त्यांना पुन्हा घरी पाठवून हेल्मेट परिधान करुनच पुढील प्रवास करण्याची मुभा दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हेल्मेट घेऊनच घराबाहेर पडावे अन्यथा पुन्हा माघारी फिरावे लागणार आहे. जिल्ह्यात १ मार्चपासून हेल्मेट सक्ती मोहीम राबविली जाणार आहे. त्यानुषंगाने सर्व संबंधितांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, दुचाकीवर हेल्मेट परिधान करुनच प्रवास करावा अन्यथा अशांवर कारवाई केली जाईल.
-ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी