वाशिम जिल्ह्यात पावसाची रिपरिप; शेतीची कामे प्रभावित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 11:12 AM2020-08-17T11:12:44+5:302020-08-17T11:12:52+5:30
गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस ठाण मांडून असल्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस ठाण मांडून असल्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. तर दुसरीकडे शहरांमधील रस्त्यांवर खड्डे बुजविण्यासाठी मुरूमाचा वापर करण्यात आल्याने रस्तेही चिखलाने माखले आहेत.
आॅगस्ट महिन्यात ९ तारखेपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस पडत आहे. तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप असल्याने शेतीची सर्व कामे प्रभावित झाली आहेत. पाणंद रस्ते चिखलमय झाल्याने शेतात जाणेही कठीण झाले आहे. मालेगाव, वाशिमसह सर्वच तालुक्यात पावसाची रिपरिप कायम असल्याने शेतांमध्ये पाणी साचत आहे. परिणामी, पिकांची वाढ खुंटून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. रात्री ९ वाजताच्या सुमारासही संततधार पाऊस झाला. यामुळे जलप्रकल्पांतील साठ्यातही वाढ झाली आहे.
मूग उत्पादक शेतकरी चिंतातूर
सध्या मूग काढणीला आला आहे. आठ दिवसापासून पाऊस असल्याने मूग सोंगणीची कामेही प्रभावित झाली आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात सोंगणी करून ठेवलेला मूग भिजला आहे. पाणंद रस्तेही चिखलमय झाल्याने शेतमाल घरी आणण्याचा प्रश्न निर्माण झाला.
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी शेतात अतिरिक्त पाणी साचल्याने पिकांना नुकसान पोहचू शकते. शेतात अतिरिक्त पाणी साचले असेल तर शेतकऱ्यांनी हे पाणी बाहेर काढून द्यावे. अतिरिक्त पाण्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडतात. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकºयांनी वेळीच खबरदारी घ्यावी.
- एस.एम. तोटावार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी