दुबार पेरणीचे संकट!

By admin | Published: July 7, 2017 01:23 AM2017-07-07T01:23:03+5:302017-07-07T01:23:03+5:30

एकट्या मानोरा तालुक्यात ४०० हेक्टरवर दुबार पेरणी : पावसाची प्रतीक्षा

Drought sowing crisis! | दुबार पेरणीचे संकट!

दुबार पेरणीचे संकट!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. दरम्यान, मानोरा तालुक्यात महाबीजचे बियाणे उगवलेच नसल्याने ४०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागणार आहे. अन्य तालुक्यातील पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यावर्षी वेळेवर पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने सुरुवातीला वर्तविला होता. त्यानंतर पाऊस लांबणीवर पडणार असल्याचा अंदाजही वर्तविला. वाशिम जिल्ह्यात मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला; मात्र त्यानंतर पावसात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबविल्या. ४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ७७ टक्के शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. यावर्षी कृषी विभागाने एकूण चार लाख नऊ हजार ६३ हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन केले. ४ जुलैपर्यंत ९२ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दरम्यान, गत दहा ते बारा दिवसांपासून पिकास योग्य असा पाऊस नसल्याने कमी दर्जाच्या जमिनीवरील पिके कोमेजून जात असल्याचे दिसून येते. मानोरा तालुक्यात कारपा परिसरात महाबीजचे बियाणे उगविले नसल्याने जवळपास ४०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य सचिन रोकडे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर त्रिसदस्य चौकशी समिती गठीत करण्यात आली. या समितीने कृषी विभागाकडे अहवाल सादर केला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.
कारंजा तालुक्यात अत्यल्प पाऊस असल्याने पेरणीचे क्षेत्रही कमी आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मालेगाव तालुक्यातील मारसूळ परिसरात शिवा घुगे, गणपत घुगे, विठ्ठल घुगे, हिम्मतराव घुगे यांसह काही शेतकऱ्यांनी यापूर्वीच दुबार पेरणी केलेली आहे. गत आठ ते दहा दिवसांपासून पाऊस नसल्याने तिबार पेरणीची भीती या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दुबार व तिबार पेरणीसाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मारसूळ येथील प्रकाश घुगे, मारोतराव मुंडे, महादेव घुगे, श्याम घुगे, प्रकाश भेंडेकर, गणपत घुगे आदींनी केली आहे.
मंगरूळपीर तालुक्यातही पिकास पोषक असा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. १० ते १५ जूनदरम्यान पेरणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी ठिबक व अन्य माध्यमातून सिंचन करीत पिके वाचविण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे दिसून येते. रिसोड तालुक्यातील वाकद परिसरातील काही शेतकऱ्यांनीदेखील सिंचनाद्वारे पिकांना पाणी देणे सुरू केले. कोरडवाहू शेतकऱ्यांनी मात्र दुबार पेरणीची भीती व्यक्त केली. जऊळका रेल्वे परिसरातही दुबार पेरणीची शक्यता वर्तविली जात आहे. माळरानावरील पिकांनी माना खाली टाकल्याने दुबार पेरणी करावी लागणार आहे. रिठद परिसरात काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. या पिकांनादेखील दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. येत्या चार-पाच दिवसात पाऊस आला नाही तर तिबार पेरणी करावी लागण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली. रिठद परिसरातील शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणीसाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य शारदा नारायण आरू यांनी ६ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देत शासनाकडे केली आहे.

Web Title: Drought sowing crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.