तलावात बुडून इसमाचा मृत्यू
By Admin | Published: September 25, 2015 12:10 AM2015-09-25T00:10:15+5:302015-09-25T00:10:15+5:30
रोजप्रमाणे तलावात आंघोळीला गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारला सकाळी साकोली तालुक्यातील चारगाव येथे घडली.
चारगावातील घटना : लोकवर्गणीतून अंत्यसंस्कार
साकोली : रोजप्रमाणे तलावात आंघोळीला गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारला सकाळी साकोली तालुक्यातील चारगाव येथे घडली. चंद्रभान गोविंदा लांजेवार (६०) रा.चारगाव असे मृतकाचे नाव आहे. चंद्रभानची परिस्थिती हलाखीची असल्याने गावकऱ्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत गाववर्गणी गोळा करून त्यांच्या अंत्यसंस्काराचा खर्च उचलला.
चंद्रभान हे नित्याप्रमाणे दररोज गावातील तलावात आंघोळ करायचे. सवयीप्रमाणे आजही चंद्रभान सकाळी तलावात आंघोळीला गेला. मात्र आज काळाने झडप घेतली. पाण्यात चंद्रभानचा श्वास गुदमरला व तलावात खोल पाण्यात बुडून मरण पावला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांचा ताफा चारगाव येथे पोहचला. चंद्रभानचे प्रेत काढण्यासाठी मासेमारांनी तलावात उडी घेतली. मात्र पाणी जास्त असल्याने मृतदेह सापडला नाही. शेवटी बाहेरगावचे मासेमारांना बोलावून मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला. साकोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा व सुन आहे.
चंद्रभानने तीन दूध डेअरीची निर्मिती केली असली तर सद्यस्थितीत त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने पोलीस पाटील गोपीनाथ लंजे, तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष नामदेव लांजेवार यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणी गोळा करून चंद्रभानच्या अंत्यसंस्काराचा खर्च उचलला. अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या पाहुण्यांनी जेवणाची सोय करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. (तालुका प्रतिनिधी)