दारूच्या नशेत बधिरिकरणतज्ज्ञ; सेवा समाप्तीची कारवाई
By संतोष वानखडे | Published: February 25, 2024 08:12 PM2024-02-25T20:12:13+5:302024-02-25T20:12:31+5:30
एका रुग्णाला सिझर करतेवेळी बधीर करण्यासाठी आय.पी.एच. एस. कार्यक्रमांतर्गत ऑन कॉल सेवा देणारे बधीरीकरण तज्ञ डॉ. सुरेश भोडणे हे दारूच्या नशेत असल्याचा प्रकार कारंजा उपजिल्हा रुग्णालयात २४ फेब्रुवारीला दुपारी उघडकीस आला होता.
वाशिम : कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील ऑन कॉल सेवा देणारा बधीरीकरण तज्ज्ञ मद्य प्राशन करून कर्तव्य बजावत असल्याचा ठपका ठेवत २५ फेब्रुवारी रोजी त्यांची सेवा समाप्त करण्याची कारवाइ वैद्यकीय अधीक्षक डॉ. नथुराम साळुंखे यांनी केली.
एका रुग्णाला सिझर करतेवेळी बधीर करण्यासाठी आय.पी.एच. एस. कार्यक्रमांतर्गत ऑन कॉल सेवा देणारे बधीरीकरण तज्ञ डॉ. सुरेश भोडणे हे दारूच्या नशेत असल्याचा प्रकार कारंजा उपजिल्हा रुग्णालयात २४ फेब्रुवारीला दुपारी उघडकीस आला होता. रुग्णाच्या नातेवाईकांनी हा प्रकार काही पुढाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर घडलेल्या या प्रकाराची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आली. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. साळुंखे हे बाहेरगावी असल्याने डॉ. पराग राठोड यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशित केले. चौकशीदरम्यान कर्तव्यावर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बधीरीकरण तज्ञ हे दारूच्या नशेत नसल्याचा अहवाल दिला होता. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयाची प्रतिमा डागाळू नये म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. नथुराम साळुंखे यांनी बधीरीकरण तज्ञावर शस्त्रक्रिया गृहात मद्यप्राशन करून कर्तव्य बजावत असल्याचा ठपका ठेवत २५ फेब्रुवारीपासून सेवा समाप्तीची कारवाई केल्याची माहिती डॉ. साळुंखे यांनी दिली.
महिन्याभरापूर्वीच एका डाॅक्टरवर कारवाइ -
कारंजा उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत एक वैद्यकीय अधिकारी २४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणाची चौकशी केली असता, वैद्यकीय अधिकारी हे मद्यधुंद असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर कार्यमुक्ततेची कारवाइ केली होती. आता पुन्हा कारंजा उपजिल्हा रुग्णालयात मद्य प्राशन केल्याने एका डाॅक्टरची सेवा समाप्त करण्यात आली.