वाशिम जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे; मच्छिमारांचा व्यवसाय बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 03:14 PM2018-02-22T15:14:10+5:302018-02-22T15:17:49+5:30
वाशिम : जिल्ह्यातील अधिकांश प्रकल्प कोरडे पडल्याने मत्स्यव्यवसाय धोक्यात सापडून या व्यवसायावर उपजिविका अवलंबून असणाऱ्या भोई समाजातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
वाशिम : सन २०१३ ते २०१५ या तीन वर्षांत पावसाने दगा दिल्याने परंपरागत मत्स्यव्यवसाय करणारा भोई समाज आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला होता. २०१६ मध्ये परिस्थिती थोडी पुर्वपदावर आली; परंतू चालूवर्षी पुन्हा जिल्ह्यातील अधिकांश प्रकल्प कोरडे पडल्याने मत्स्यव्यवसाय धोक्यात सापडून या व्यवसायावर उपजिविका अवलंबून असणाऱ्या भोई समाजातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
गतवर्षी घटलेल्या पर्जन्यमानामुळे भोई समाजाचा मच्छिमारीचा पारंपरीक व्यवसाय संकटात सापडला. त्याचे विपरित परिणाम यंदा दिसून येत आहेत. जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १२२ लघूप्रकल्पांपैकी ७० टक्के प्रकल्प कोरडे असून उर्वरित प्रकल्पांची पाणीपातळीही झपाट्याने खालावल्यामुळे मत्स्यव्यवसाय ठप्प पडला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाºया भोई समाजातील अधिकांश कुटूंब मच्छिमार असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. विशेष बाब म्हणजे गेल्या काही वर्षांत युवकवर्गही या व्यवसायाकडे वळले होते. मात्र, पाणीच नसल्याने त्यांना इतर रोजगार शोधावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
वाशिम जिल्ह्यातील ठराविक धरणांमध्ये मत्स्यबीज सोडण्यात आले होते. मात्र, मात्र, पाणीपातळी झपाट्याने खालावल्यामुळे मत्स्यबीज मृत पावण्यासोबतच सद्य:स्थितीत व्यवसाय ठप्प पडला आहे.
- राजू सहातोंडे, मत्स्यव्यावसायिक, वाशिम