अचूक खात्याअभावी शिष्यवृत्ती रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 01:59 PM2019-09-23T13:59:24+5:302019-09-23T13:59:34+5:30
बँक खाते क्रमांक तसेच आयएफएससी कोड क्रमांकात त्रूट्या असल्याने लाखो रुपयांची रक्कम गत साडेतीन वर्षांपासून बँकेतच पडून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : समाजकल्याण विभागाच्यावतीने मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती जिल्ह्यातील ७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळाली नाही. बँक खाते क्रमांक तसेच आयएफएससी कोड क्रमांकात त्रूट्या असल्याने लाखो रुपयांची रक्कम गत साडेतीन वर्षांपासून बँकेतच पडून आहे.
समाजकल्याण विभागाच्यावतीने इयत्ता पाचवी ते दहावीतील पात्र विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले, मॅट्रिक पूर्व, अस्वच्छ व्यवसाय यासह विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांकडून योग्य त्या प्रस्तावासह बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड आदींची माहिती संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी समाजकल्याण विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे. अनेक विद्यार्थ्यांचे अचूक बँंक खाते क्रमांक तसेच आयएफएससी कोड समाजकल्याण विभागाकडे प्राप्त नसल्याने शिष्यवृत्ती रखडली आहे. एकूण अडीच हजार विद्यार्थ्यांचे अचूक बँक खाते क्रमांक प्राप्त नव्हते. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर शिक्षण विभागामार्फत अनेक विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक प्राप्त झाले. अद्याप ७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या बँक खाते क्रमांकाची प्रतिक्षा आहे. तीन वर्षांपूर्वी इयत्ता नववी व दहावीत असणारे परजिल्ह्यातील अनेक विद्यार्थी जिल्ह्याबाहेर गेल्याने, त्यांचा शोध घेण्याची कसरत करावी लागत आहे.
जिल्हा परिषदेच्या सभेतही गाजला होता मुद्दा
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तातडीने द्यावी यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीच्या सभेतही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. मध्यंतरी गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. त्यानंतर तालुकास्तरीय शिक्षण विभागाकडून १६०० ते १७०० विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक प्राप्त झाले. उर्वरीत विद्यार्थ्यांनी अचूक बँक खाते क्रमांक सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाने केले.