कृषी योजनांमुळे शेतकर्यांना दिलासा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:07 AM2017-08-17T01:07:08+5:302017-08-17T01:07:31+5:30
वाशिम : शेती व शेतकरी यांच्या विकासावर शासनाचा विशेष भर आहे. जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यासारख्या जलसंधारण व कृषी विकासाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी आयोजित मुख्य प्रशासकीय ध्वजारोहणप्रसंगी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री ना. राठोड म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, या काळात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमुळे शेतकर्यांना दिलासा मिळत आहे. मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातूनही जिल्ह्यात चांगले काम होत आहे. जिल्ह्यात ३१ मेपर्यंत टोकन वाटप केलेल्या सर्व शेतकर्यांची तूर खरेदी करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. त्यानुसार २६ जुलैपासून आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ७ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. उर्वरित सर्व शेतकर्यांची तूर ३१ ऑगस्ट पूर्वी खरेदी करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून, याकरिता शासकीय सुटीच्या दिवशीही तूर खरेदी सुरू ठेवण्यात आली आहे, असे ना. राठोड यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ४0३ गावांतील सात-बाराचे री-एडिटिंगचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री विशेष साहाय्य निधीतून जिल्हाधिकार्यांना दोन कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून कारंजा तालुक्यातील भामदेवी गावाचा सर्वांगीण विकास केला जात आहे. या गावात सलग समतल चर, शेततळी, शेडनेटचे काम झाले असून, शेतीपूरक व्यवसाय निर्मितीसाठी १७0 दुधाळ म्हशी, १३0 शेळी व १३ बोकडाचे वाटप करण्यात आले आहे.
या गावात दुग्धविकास सहकारी संस्थेच्या माध्यमातून १000 लीटर क्षमतेचे मिल्क प्रोसेसिंग युनिट उभारले असून, विक्रीसाठी कारंजा शहरात विक्री केंद्रसुद्धा सुरू झाले असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या आराखड्याला शासनाच्या उच्च स्तरीय समितीने मान्यता दिली आहे. या ठिकाणी बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणारे संग्रहालय, खुले सभागृह यासह इतर पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मोहन शिरसाट यांनी केले.