नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका
By Admin | Published: June 22, 2016 12:36 AM2016-06-22T00:36:12+5:302016-06-22T00:36:12+5:30
प्रवासी त्रस्त: कारंजा बसस्थानकावर घाणीचे साम्राज्य.
कारंजा लाड (जि. वाशिम): महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कारंजा आगाराच्या भोंगळ कारभारामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. या आगारातील नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहेच. शिवाय बसस्थानक परिसरात पावसामुळे मोठमोठे डबके साचल्याने घाणीमुळे आरोग्यालाही धोका आहे. या आगारातील बर्याच बसेसची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. काही बसच्या खिडक्यांची तावदाणे फुटलेली आहेत, तर काहींची आसनेही तुटलेल्या अवस्थेत आहेत. बहुतांश बसेस १५ लाख किलोमीटरपेक्षा अधिक चाललेल्या आहेत. या भंगार बसमधून प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. अनेकदा प्रवासी मंडळातर्फे याबाबत वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रारी करूनही या गंभीर बाबीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आगार प्रमुखाचे वाहक व चालकांवर नियंत्रण नसल्यामुळे अनेक बस ऐनवेळी रद्द होण्याचे प्रकार घडत आहे. कारंजा आगारातून काही लांब पल्ल्याच्या बसेसही सुटतात. त्या बसेसची स्थितीही फारशी चांगली नाही. जिल्ह्यांतर्गत धावणार्या काही बसेस रस्त्यात केव्हा नादुरुस्त होईल, याचा नेम नाही. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा भंगार बसमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. प्रवाशांनी अनेकदा तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. नादुरुस्त बसमुळे अनेकदा फेर्या रद्द होण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे प्रवाशांना खोळंबून राहावे लागत. याची दखल घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.