ढगाळ वातावरणामुळे वाशिम जिल्ह्यातील तुरीचे पिक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 03:54 PM2017-11-21T15:54:30+5:302017-11-21T15:56:46+5:30
वाशिम: जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तुरीचे पीक संकटात सापडले आहे. अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे तुरीवर किडींचा प्रादूर्भाव वाढला असून, फुलांची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. यामुळे चिंताग्रस्त असलेले शेतकरी विविध प्रयोग करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात यंदा ५७ हजार ७७३ हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची पेरणी झाली आहे. सुरुवातीला अपुºया पावसामुळे संकटात सापडलेल्या या पिकाला परतीच्या पावसाने मोठा आधार दिला आणि पीक बहरले. आता हे पीक शेंगा फुलावर असतानाच गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणामुळे तूर पिकाची फुले गळणे सुरू झाले असून, पाने खानारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आदि किडींचाही प्रादूर्भाव पिकावर झाला आहे. यामुळे पीक उत्पादनात मोठी घट येण्याची भिती असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यात शेंगा पोखरणाºया अळीवर नियंत्रणासाठी किटकनाशक फवारणीचा पर्याय असला तरी, ढगाळ वातावरणामुळे गळणारी फुले थांबविण्यासाठी कोणताही पर्याय नसल्याने पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भिती निर्माण झाली आहे. आता ढगाळ वातावरण निवळल्यानंतर धुके पडण्यास सुरुवात झाली, तर या पिकावरील संकट अधिकच वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे शेतकºयांमागील नैसर्गिक संकटाचे दुष्टचक्र कायमच असल्याचे स्पष्ट होत आहे.