सततच्या पावसाने शेतातील उभ्या सोयाबीन पिकाला आले ‘अंकुर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:47 AM2021-09-23T04:47:43+5:302021-09-23T04:47:43+5:30
भर जहागीर येथील शेतकरी भगवान भिवाजी चोपडे यांच्या साडेसहा एकर शेतावर महामंडळ ३३५ वाणाचा पेरा केलेला आहे. या ...
भर जहागीर येथील शेतकरी भगवान भिवाजी चोपडे यांच्या साडेसहा एकर शेतावर महामंडळ ३३५ वाणाचा पेरा केलेला आहे. या सोयाबीन पीक काढणीचा कालावधी साधारण ९० ते १०० दिवसांचा आहे. चोपडे यांनी ९ जूनला पेरणी केलेली आहे. आज सोयाबीन पीक काढणीचा कालावधी पूर्ण झालेला आहे; परंतु संततधार पावसाने शेतातील उभ्या सोयाबीन पिकाच्या शेंगांनाच अंकुर आल्याने शेतावर बहरलेल्या सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. पर्यायाने उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकरी चिंचाग्रस्त झाले आहेत. हा प्रकार अनेक शेतकऱ्यांच्या शेतावरील उभ्या सोयाबीनसंदर्भात घडला आहे. कृषी विभागाने सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा तात्काळ सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
माझ्या शेतावर महामंडळ ३३५ सोयाबीन वाणाची साडेसहा एकर शेतावर पेरणी केलेली आहे. पीक काढणीचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने व संततधार पावसाने उभ्या सोयाबीन पिकाला अंकुर आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
-भगवान भिवाजी चोपडे, शेतकरी भर जहागीर