प्रकृती खालावल्याने उपोषणकर्ते शेतकरी रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:43 AM2021-02-09T04:43:19+5:302021-02-09T04:43:19+5:30
समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वारंगी येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, भूसंपादन अधिनियम २०१३ची योग्य अंमलबजावणी झाली ...
समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वारंगी येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, भूसंपादन अधिनियम २०१३ची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याचे कारण समोर करून विजय कोंडूजी दहात्रे, मनोज दहात्रे, कृष्णा दहात्रे, शोभा दहात्रे, कुणाल दहात्रे यांनी जमीन संपादनास नकार दिला. असे असताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तथा महसूल विभागाचे अधिकारी जबरीने जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यास विरोध म्हणून विजय दहात्रे यांनी ५ फेब्रुवारीपासून रिधोरा गट क्र.२७ मध्ये बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
उपोषणस्थळी प्रभारी तहसीलदार रवि राठोड, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रतिनिधी व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन जमीन ताब्यात घेण्याबाबत उपोषणकर्त्या शेतकऱ्याशी चर्चा केली. योग्य मूल्यांकन झाल्याशिवाय जमीन न देण्याचा निर्णय कायम ठेवत उपोषण कायम ठेवले, परंतु ६ फेब्रुवारीला दहात्रे यांची वैद्यकीय तपासणी केली असता, प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
................
बॉक्स :
उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार
न्यायोचित मागणीसाठी ५ फेब्रुवारीपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण कितीही दडपण आणले, तरी न्याय मिळेपर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्ते शेतकरी विजय दहात्रे यांनी बोलून दाखविला.